Amelia Kerr Century: न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने सोफी डिव्हाईनच्या निवृत्तीनंतर अमेलिया केरची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती केली. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात अमेलियाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत क्रिकेट बोर्डाचा निर्णय सार्थ ठरवला. कर्णधार म्हणून खेळताना तिने पहिल्याच सामन्यात तुफानी शतक ठोकले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
'कॅप्टन' अमेलियाचे ऐतिहासिक शतक
अमेलिया केरने केवळ ५१ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. हे तिचे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. तिच्या या खेळीत १९ चौकारांचा समावेश होता. तिने तब्बल ७६ धावा केवळ चौकारांच्या मदतीने कुटल्या. अमेलियाच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत २०२ धावांचा डोंगर उभा केला. तिला इझाबेला गेज (नाबाद ६६) हिने मोलाची साथ दिली.
अमेलियाची अष्टपैलू कामगिरी
फलंदाजीनंतर अमेलियाने गोलंदाजीतही आपली जादू दाखवली. तिने ४ षटकांत केवळ १४ धावा देऊन सर्वाधिक २ बळी घेतले. २०२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत ८ बाद ११० धावाच करू शकला. न्यूझीलंडने हा सामना ९२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
कर्णधार म्हणून यशस्वी सुरुवात
सोफी डिव्हाईनसारख्या दिग्गज खेळाडूच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंड संघ एका नव्या वळणावर आहे. अमेलिया केरने पहिल्याच सामन्यात ज्याप्रकारे नेतृत्व केले आणि स्वतःच्या कामगिरीने एक आदर्श पाडून दिला, त्यावरून न्यूझीलंड क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित असल्याचे दिसत आहे.