MS Dhoni Driver Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतीय संघाला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता ३० नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना रांचीच्या मैदानावर आहे. या मालिकेसाठी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली रांचीमध्ये दाखल झाला. त्याने सरावही केला. त्यानंतर विराट आणि इतर भारतीय खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनीच्या रांची येथील आलिशान घरी डिनर पार्टीसाठी हजेरी लावली. एमएस धोनीच्या घरी भारतीय क्रिकेटपटू डिनर पार्टीसाठी भेटले. त्यानंतर विराटला घरी सोडण्यासाठी धोनी स्वत: कार चालवताना दिसला.
धोनी बनला विराटचा 'ड्रायव्हर'
विराट आणि इतर खेळाडूंना धोनीने आपल्या घरी डिनर पार्टीसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी विराट कोहलीदेखील आला होता. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचे नाते खूपच चांगले आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला कर्णधार करण्याचा सल्लाही त्यानेच दिला होता. विराटच्या कठीण काळात धोनीने त्याला सांभाळून घेतले. तसेच, विराटनेदेखील धोनीच्या अनुभवाचा वेळोवेळी योग्य पद्धतीने आदर केला. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीनंतरही दोघांमधील मैत्रीचे नाते घट्ट आहे. याच मित्रासाठी धोनी चक्क ड्रायव्हर बनला. पार्टी संपल्यानंतर धोनी स्वत: विराट कोहलीला त्याच्या कारमधून हॉटेलला सोडण्यासाठी गेला. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत.
विराटची झलक टिपण्यासाठी चाहत्यांची गर्दी
टी२० आणि कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर, विराट केवळ वनडे संघातच दिसतो. भारताचा पहिला सामना ३० नोव्हेंबरला झारखंडच्या रांची येथील स्टेडियमवर आहे. त्यासाठी सर्व खेळाडू रांची येथे दाखल झाले आहेत. त्याचदरम्यान धोनीने खेळाडूंना आपल्या घरी डिनर पार्टीसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी विराट कोहलीदेखील आला होता. विराट आपल्या आलिशान कारमधून धोनीच्या घरी दाखल झाला. विराट येणार याची चाहत्यांना कल्पना असल्याने ते गेटबाहेर त्याची एक झलक टिपण्यासाठी गर्दी करून उभे होते. विराटची कार जेव्हा गेटपाशी आली तेव्हा विराटने सर्वांना हसून अभिवादन केले आणि मग त्याची कार गेटमधून आत गेली. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दरम्यान, विराट कोहली सोबतच भारताचा युवा विकेटकिपर ऋषभ पंत, चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांसारख्या खेळाडूंनीही धोनीच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली होती. यासंबंधीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.