Join us

MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा

MS Dhoni Captain Cool Trademark: अर्ज स्वीकारला, पुढील प्रक्रिया काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:08 IST

Open in App

MS Dhoni Captain Cool Trademark: टीम इंडियाचा वर्ल्डकप विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपल्या शांत व संयमी स्वभावामुळे 'कॅप्टन कूल' हे बिरूद पटकावले आणि मिरवले. आता धोनीने या नावावर अधिकृतरित्या हक्क सांगितला आहे. धोनीने 'कॅप्टन कूल' या नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला आहे. जून २०२३ मध्ये धोनीने कोलकाता ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑफिसमध्ये या संदर्भातील अर्ज दाखल केला होता. हा अर्ज स्वीकारण्यात आला असल्याचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अजूनही धोनीला 'कॅप्टन कूल' नावावर हक्क सांगण्यासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण ट्रेडमार्क मिळवण्यासाठी प्रक्रिया काहीशी वेगळी आहे. जाणून घेऊया या प्रक्रियेबद्दल.

धोनीला ट्रेडमार्क कसा मिळणार?

जून २०२३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या अर्जावर कोलकाता ट्रेडमार्क कार्यालयाकडून यंदाच्या म्हणजे जून २०२५ ला शिक्कामोर्तब करण्यात आले. हा अर्ज स्वीकारण्यात आला असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. धोनीचा अर्ज सध्या "accepted and advertised" अशा स्टेटसमध्ये आहे. म्हणजेच अर्जातील विनंती स्वीकारण्यात आली आहे आणि प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहे. ट्रेडमार्क जर्नलमध्ये १६ जून २०२५ रोजी 'कॅप्टन कूल' या शब्दाबद्दलची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. आता 'कॅप्टन कूल' शब्दाचे सर्व हक्क अर्जदाराला देण्याबाबत कुणालाही कसलाही आक्षेप आहे का? याची चाचपणी केली जाणार आहे. कुणालाही याबाबत आक्षेप असल्यास १६ जून २०२५ पासून पुढील १२० दिवसांच्या कालावधीत याबाबत आक्षेप नोंदवण्याची मुदत असणार आहे. जर त्या कालावधीत कोणताही आक्षेप नोंदवण्यात आला नाही, तर 'कॅप्टन कूल' हा शब्द धोनीच्या मालकीचा होईल.

धोनीने क्रीडा प्रशिक्षण आणि सरावाशी संबंधित क्षेत्रात 'कॅप्टन कूल'वर अधिकार मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. 'कॅप्टन कूल' हा ट्रेडमार्क मंजूर झाल्यानंतर धोनीशिवाय इतर कोणीही क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित क्षेत्रात 'कॅप्टन कूल'चा व्यावसायिक वापर करू शकत नाही.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड