गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत विक्रमी नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले होते. मात्र विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेल्या मोहसिन नक्वी यांच्याहस्ते विजेतेपदाची ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोहसिन नक्वी पुरस्कार वितरण सोहळ्यातून आशिया चषकाची ट्रॉ़फी घेऊन पळाले होते. त्यानंतर बीसीसीआयने नक्वी यांची आशियाई क्रिकेट समितीपासून ते आयीसीपर्यंत कोंडी केली होती. तरीही मोहसिन नक्वी हे सुधरण्याचे नाव घेत नाहीहेय. आता भारताला आशिया चषकाची ट्रॉफी मिळू नये म्हणून नक्वी यांनी नवी चाल खेळली आहे.
भारतीय संघाने मोहसिन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मोहसिन नक्वी यांनी ही ट्रॉफी पळवून नेली होती. त्यानंतर ही ट्रॉफी त्यांनी आशियाई क्रिकेट समितीच्या कार्यालयात ठेवली होती. सध्या ही ट्रॉफी आशियाई क्रिकेट समितीच्या दुबई येथील कार्यालयात आहे. तसेच अध्यक्षांच्या परवानगीशिवाय ही ट्रॉफी हलवता कामा नये, तसेच कुणालाही देता कामा नये, असे आदेश मोहसिन नक्वी यांनी दिली आहे.
दरम्यान, आता नक्वी यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर बीसीसीआय काय पाऊल उचललं आणि नक्वी यांच्याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच नक्वी यांच्या पावित्र्यामुळे आता आशिया चषकाची ट्रॉफी भारतीय संघाला कधी मिळणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.