Asia Cup Trophy, Mohsin Naqvi IND vs PAK: टीम इंडियाला २०२५चा आशिया कप जिंकूनही अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे वैयक्तिकरित्या भारतीय संघाला ट्रॉफी सोपवू इच्छितात, परंतु टीम इंडिया नकार देत आहे. त्यामुळेच आशिया कप ट्रॉफीचा वाद अधिक चिघळला आहे. यादरम्यान, मोहसिन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी देण्यासाठी पुन्हा एक समारंभ आयोजित करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्या या निर्णयाने सारेच चक्रावून गेले आहेत.
मोहसीन नक्वी यांचा नवा प्लॅन
आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद अजूनही सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ट्रॉफीबाबत एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याशी संपर्क साधत आहे. कराची येथे पत्रकारांशी बोलताना मोहसिन नक्वी म्हणाले की, एसीसीने बीसीसीआयला कळवले आहे की १० नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये भारताला ट्रॉफी सोपवण्यासाठी एक औपचारिक समारंभ आयोजित केला जाईल. डॉनमधील वृत्तानुसार, गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि भारत यांच्यातील अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळानंतरही नक्वी हे वैयक्तिकरित्या भारताला ट्रॉफी सुपूर्द करण्यावर ठाम आहेत.
मोहसीन नक्वी काय म्हणाले?
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी कराची येथे माध्यमांना सांगितले की, बीसीसीआयसोबत अनेक पत्रांची देवाणघेवाण झाली आहे आणि आशियाई क्रिकेट परिषदेने त्यांना कळवले आहे की १० नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये एक समारंभ आयोजित केला जाऊ शकतो. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या संघाला तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना आमंत्रित करण्यात आले आहे. "एसीसीने बीसीसीआयला पत्र लिहून १० नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये समारंभ आयोजित करण्याची सूचना केली आहे. तुमचा कर्णधार आणि खेळाडू आणा आणि माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारा," असे सांगण्यात आल्याचे नक्वी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आयसीसी आणि एसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. आयसीसी बोर्डाची बैठक ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये होणार आहे. तसेच, आशिया कप ट्रॉफी एसीसी मुख्यालयात ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.