भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड यांच्यातील स्लेजिंगचा किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. अॅडिलेड कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ट्रॅविस हेडला बाद केल्यावर सिराजनं हातवारे करुन विकेट्सचा जल्लोष साजरा केला. ट्रॅविस हेडनंही मग त्याला खुन्नस दिली. स्लेजिंगनंतर या दोघांच्यामध्ये गोडवा दाखवणारा सीनही पाहायला मिळाला. पण चुकीला माफी नाही, असे म्हणत आधी दोघांनी जे वर्तन केलं ते चुकीचं आहे, असे सांगत आयसीसीने दोघांनाही अद्दल घडवली आहे. पण त्याचा मोठा फटका बसला तो सिराजला.
हेडच्या तुलनेत सिराजवर कठोर कारवाई
अॅडिलेड कसोटी सामन्यात मैदानात ट्रॅविससोबत घेतलेला पंगा मोहम्मद सिराजसाठी अधिक महागडा ठरलाय. कारण आयसीसीनं आचार सहिंतेच उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला कलम २.५ अंतर्गत दोषी ठरवले आहे. त्यामुळे डिमेरिट पॉइंट्स भारतीय गोलंदाजाला मॅच फीच्या २० टक्के रक्कम दंडाच्या रुपात भरावी लागणार आहे. दुसरीकडे ट्रॅविस हेडला २.१३ अंतर्गत दोषी ठरवल्यामुळे त्याच्या नावे फक्त एक डिमेरिट पॉइंट्स जमा झाला आहे. दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली आहे.
सिराजला लाखो रुपयांचा बसणार फटका
भारतीय खेळाडूंना एका कसोटी सामन्यासाठी जवळपास १५ लाख रुपये मानधन मिळते. या हिशोबानं मानधनातील २० टक्के कपातीच्या शिक्षेमुळे मोहम्मद सिराजला ३ लाख रुपये एवढी किंमत मोजावी लागणार आहे. ट्रॅविस हेड आणि मोहम्मद सिराज यांच्यातील सीन चांगलाच चर्चेत आला. दोघांनी यावर प्रतिक्रिया दिल्याचेही पाहायला मिळाले होते.