Haseen Jahan reaction Mohd Shami Alimony: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला घटस्फोट प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. उच्च न्यायालयाने शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांना दरमहा ४ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. शमी आणि हसीन जहाँ हे बऱ्याच काळापासून वेगळे राहतात. न्यायालयाचा निर्णय सात वर्षांपूर्वीपासून लागू असणार आहे. शमीला ही रक्कम देखभाल खर्च अथवा पोटगी म्हणून द्यावी लागेल. न्यायाधीश अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने हसीन जहाँच्या याचिकेवर मंगळवारी हा आदेश दिला. न्यायालयाच्या निर्णयावर मोहम्मद शमीच्या पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ हिने प्रतिक्रिया दिली.
"प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते आणि जबाबदारीने उत्तरे द्यावीच लागतात. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे यासाठी मी देवाचे आभार मानते. माझे सध्या काहीही थेट उत्पन्न नाही. शमीने आपल्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी. त्याने नकार दिला होता म्हणूनच आम्हाला कोर्टात जावे लागले. लग्नाआधी मी मॉडेलिंग करत होते. पण लग्नानंतर २०१४ मध्ये शमीच्या आग्रहाखातर मी मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्र सोडले. मी गृहिणी बनून राहावं असा शमीचा आग्रह होता. माझं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून मी मान्य केलं. पण त्यानंतर माझी आर्थिकदृष्ट्या खूप आबाळ झाली," असे हसीन जहाँ म्हणाली.
"तुम्हा जेव्हा रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा कळत नाही. माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्याशी तो असा खेळ करेल असे मला वाटले नव्हते. एकवेळ देव काही गोष्टींचा विचार करेल. पण शमी अजूनही आपल्या मुलीच्या काळजीचा विचार करत नाही. त्याच्या याच हेकेखोर स्वभावामुळे त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले," असा आरोपही हसीन जहाँने केला.
दरम्यान, मोहम्मद शमीला दरमहा देखभाल खर्च म्हणून पत्नीला १.५० लाख रुपये आणि त्यांच्या मुलीला दरमहा २.५० लाख रुपये असे एकूण ४ लाखांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शमी त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी अथवा इतर काही खर्चासाठी निर्धारित रकमेव्यतिरिक्त अधिक काही स्वेच्छेने देऊ इच्छित असेल तर, त्यासाठी तो स्वतंत्र आहे, असेही न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.