Join us  

MI vs KXIP Latest News : क्विंटन डी'कॉकच्या खेळीनंतर पोलार्ड-कोल्टरचा फिनिशिंग टच, मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान

MI vs KXIP Latest News : सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाला आज खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2020) लढतीत मनोधैर्य उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( Kings XI Punjab) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 9:15 PM

Open in App

MI vs KXIP Latest News : सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाला आज खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2020) लढतीत मनोधैर्य उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( Kings XI Punjab) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. MI  संघ एका विजयामुळे प्ले-ऑफच्या समीप जाणार आहे तर आणखी एक पराभव KXIP संघाला या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरू शकतो. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांनी MIला सुरुवातीलाच धक्के देत बॅकफुटवर पाठवले. पण, क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock)च्या अर्धशतकानंतर किरॉन पोलार्ड व नॅथन कोल्टर-नायर यांनी फिनिशिंग टच देताना मुंबई इंडियन्सला मोठं आव्हान उभं करून दिलं. क्विंटन डी'कॉकनं केली सचिन तेंडुलकरच्या १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात रोहित शर्माला ( ९) माघारी पाठवून KXIPनं मोठं यश मिळवलं. अर्शदीप सिंगनं हिटमॅनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू न देता बाद केले. अर्शदीपनं ६व्या षटकात इशान किशनला ( ७) बाद करून MIला कोंडीत पकडले. क्विंटन डी'कॉक एका बाजूनं खिंड लढवत आहे. क्विंटन आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची ५८ धावांची भागीदारी रवी बिश्नोई यानं तोडली. कृणाल ३४ धावांवर माघारी परतला.

मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्यानं पहिल्याच चेंडूंवर खणखणीत षटकार खेचला. क्विटन डी'कॉकनं सातत्यपूर्ण खेळ करताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. षटकारानं धावांचं खातं उघडणाऱ्या हार्दिकला ( ८) मोहम्मद शमीनं बाद केलं. मुंबई इंडियन्सकडून सलग तीन सामन्यांत ५०+ धावा करणारा क्विंटन हा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी २०१०मध्ये सचिन तेंडुलकरनं अशी कामगिरी केली होती. पण, ख्रिस जॉर्डननं MI ला धक्का देताना क्विंटनचा झंझावात रोखला. क्विंटन ४३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा करून माघारी परतला.

किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात पोलार्ड व नॅथन कोल्टर नायर यांनी दोन षटकार व दोन चौकारांसह २२ धावा चोपून काढल्या.  या दोघांनी नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या. 

टॅग्स :IPL 2020किरॉन पोलार्डक्विन्टन डि कॉकमुंबई इंडियन्सकिंग्स इलेव्हन पंजाब