अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान याने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय. क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची मोठी कामगिरी करत त्याने कॅरेबियन स्टार ड्वेन ब्रावोचा विश्व विक्रम मोडीत काढला. राशिद खान याने MI केप टाउन आणि पार्ल्स रॉयल्स यांच्यातील दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी-२० लीगमधील सामन्यात करामती खाननं नवा इतिहास रचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राशिद खाननं MI फ्रँचायझी संघाकडून दक्षिण आफ्रिकेत साधला मोठा डाव
दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये राशिद खान मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीच्या मालकीच्या MI केपटाउन संघाकडून खेळत आहे. पहिल्या क्वालिफायर स्पर्धेत MI केपटाउन संघानं पहिल्याक्वालीफायर लढतीत पार्ल्स रॉयल्स संघाला ३९ धावांनी पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली. MI फ्रँचायझी संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच फायनल खेळताना दिसणार आहे. संघाच्या विजयात अफगानिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खान याने कमालीची गोलंदाजी केली. ३३ धावा खर्च करून त्याने २ विकेट्स घेतल्या. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसतो राशिद खान
राशिद खान याच्या खात्यात आंतरारष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये १६१ विकेट्सची नोंद आहे. देशांतर्गत आणि फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना त्याने ४७२ विकेट्स घेतल्या आहेत. MI केपटाउन शिवाय फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, एडिलेड स्ट्राइकर्स, ससेक्स शार्क्स आणि ट्रेंट रॉकेट्स संघाकडून खेळताना पाहायला मिळाले आहे.
अबतक ६३२! आधी ड्वेन ब्रावोच्या नावे होता सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
राशिद खान याने आपल्या ४६१ व्या टी-२० सामन्यात या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ब्रावोचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. ड्वेन ब्रावोनं ५८२ सामन्यात ६३१ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला मागे टाकतं आता राशिद खान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. राशिद खानच्या खात्यात ६३२ विकेट्सची नोंद झालीये.
टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- ६३२ - राशिद खान
- ६३१ -ड्वेन ब्रावो
- ५७४ -सुनील नरेन
- ५३१ -इम्रान ताहिर
- ४९२ -शाकिब अल हसन
- ४६६ -आंद्रे रसेल