भारतातील देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये खेळलेला क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात शिवालिकविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणात पीडितेची वैद्यकीय चाचणी कोर्टातील जबाब आणि इतर कारवाईही पूर्ण झालीआहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून शिवालिकचा शोध घेतला जात आहे. तसेच कुठल्याही क्षणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना एसीपी आनंद राजपुरोहित यांनी सांगितले की, सेक्टर दोन, कुडी भगतासनी येथील रहिवासी असलेल्या एखा तरुणीने क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्याविरोधात आरोप केला आहे. सदर तरुणी २०२३ साली फेब्रुवारी महिन्यात बडोदा येथे फिरायला गेली होती. तिथे तिची शिवालिक याच्याशी भेट झाली. तसेच दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. तसेच दोघांमध्ये फोनवरून तासनतास बोलणं होऊ लागलं. त्यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांची २०२३ मध्ये भेट झाली आणि या दोघांचाही साखरपुडाही झाला. साखरपुड्यानंतर या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले.
शिवालिक याने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात या तरुणीला भेटण्यासाठी बडोदा येथे बोलावले. तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी आपला मुलगा आता हे नातं पुढे नेऊ शकत नाही, असे तिला सांगितले. त्यानंतर संतापलेल्या तरुणीने या प्रकरणी शिवालिकविरोधात गुन्हा दाखल केला. शिवालिक हा गुजरातमधील बडोदा येथील रहिवासी असून, २०२४ मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघात होता. शिवालिक हा अष्टपैलू क्रिकेटपटू असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने बडोद्याचं प्रतिनिधित्व केलं आहे.