नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोलंबो येथे झालेला सामना भारताने जिंकल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण असतानाच, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने नव्या वादाला तोंड फुटले आहे. "पाकिस्तानचा पराभव झाला की मला दुःख होते," असे खळबळजनक विधान काटजू यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा आणि वैचारिक दृष्टिकोन मांडला आहे. कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी समाजमाध्यमांवर चर्चेला उधाण आले आहे. काटजू यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान हे मुळात एकच देश आहेत आणि या दोन्ही टीम्स त्यांच्यासाठी 'स्वतःच्याच' आहेत.
काटजू यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दांत फाळणीवर टीका केली आहे. ते म्हणतात, "भारत आणि पाकिस्तान हे एकच राष्ट्र आहे, जे ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिमांना आपापसात लढत ठेवण्यासाठी 'बोगस' द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारे विभागले. ब्रिटिशांचे हे कारस्थान केवळ यासाठी होते की, एकसंध भारत चीनप्रमाणे एक आधुनिक औद्योगिक महासत्ता म्हणून उदयोन्मुख होऊ नये आणि पाश्चात्य उद्योगांना आव्हान देऊ नये."
पाकिस्तानच्या पराभवाचे दुःख का?
काटजू पुढे म्हणतात की, "मी भारतीय असलो तरी पाकिस्तानच्या टीमलाही मी माझीच टीम मानतो. त्यामुळे काल कोलंबोमध्ये पाकिस्तानचा झालेला पराभव पाहून मला दुःख झाले आहे, जसे अनेक पाकिस्तानी नागरिकांना झाले असेल. जेव्हा एक देश दुसऱ्याशी लढतो तेव्हा ठीक आहे, पण इथे आपण स्वतःशीच लढत आहोत असे मला वाटते."
काटजू यांचा 'मास्टर प्लॅन'
केवळ दुःख व्यक्त करून प्रश्न सुटणार नाही, असे सांगत काटजू यांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी एक क्रांतिकारी सूचना मांडली आहे. त्यांच्या मते, पाकिस्तान सरकारने विद्यमान क्रिकेट बोर्ड बरखास्त करून खालील दिग्गजांचे नवीन बोर्ड स्थापन करावे.
अध्यक्ष: जावेद मियाँदाद
उपाध्यक्ष: वसीम अक्रम
सदस्य: वकार युनूस, इंजमाम-उल-हक, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आणि एक तज्ज्ञ फिरकीपटू.
या नवीन बोर्डाला खेळाडू निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य, पुरेसा निधी आणि आधुनिक सुविधा दिल्या जाव्यात. जर या सूचना अमलात आणल्या, तर पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा १९९२ प्रमाणे जागतिक स्तरावर अव्वल स्थानी पोहोचेल आणि विश्वचषक जिंकू शकेल, असा विश्वास काटजू यांनी व्यक्त केला आहे.