क्वालालंपूर - टी-20 क्रिकेटच्या आगमनानंतर क्रिकेट खूपच वेगवान झाले आहे. पण मंगळवारी क्रिकेट जगताला एका अजब टी-२० सामना पाहायला मिळाला. केवळ २० धावा, १० विकेट्स आणि अवघ्या ११.५ षटकांच्या खेळातच आटोपलेल्या या सामन्यात मलेशियाने अवघ्या दहा चेंडूत आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळवला.
आयसीसीच्या वर्ल्ड टी-२० आशियाई विभागाच्या पात्रता स्पर्धेत मलेशिया आणि म्यानमानदरम्यान हा सामना खेळवला गेला. या लढतीत मलेशियाने नाणेफेक जिंकून म्यानमारला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. मात्र म्यानमारचे फलंदाज मलेशियाचा डावखुऱा फिरकीपटू पवनदीप सिंहच्या फिरकी गोलंदाजीसमोर फारवेळ टिकाव धरू शकले नाहीत. १०.१ षटकांतच त्यांची ८ बाद ९ अशी बिकट अवस्था झाली. मात्र याचवेळी पाऊस आल्याने खेळ थांबवावा लागला. मलेशियाकडून पवनदीप सिंहने चार षटकात १ धाव देत पाच विकेट्स घेत म्यानमारची दाणादाण उडवली.
पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियामानुसार मलेशियाला विजयासाठी ८ षटकांत ६ धावांचे आव्हान देण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना मलेशियाचे सलामीवीरही शुन्यावर बाद झाले. मात्र सुहान अलागर्थन याने सामन्यातील एकमेव चौकार ठोकत मलेशियाला केवळ १.४ चेंडूत विज मिळवून दिला.