Sharayu Kulkarni's Celebration After Smriti Mandhana's Wicket Goes Viral : आयपीएल स्पर्धेनंतर सध्या महाराष्ट्र टी-२० लीग स्पर्धा चर्चेचा विषय ठरत आहे. महिला महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेत नॅशनल क्रश आणि भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना रत्नागिरी जेट्स संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पुणे वॉरियर्स विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात स्मृतीच्या भात्यातून पहिले अर्धशतकही पाहायला मिळाले. पण या अर्धशतकी खेळीशिवाय सर्वाधिक चर्चा रंगतीये ती रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स विरुद्धच्या स्मृतीच्या खिलाडूवृत्तीची आणि सोलापूर स्मॅशर्सच्या संघाकडून तिची विकेट घेणाऱ्या शरयू कुलकर्णीची. स्मृतीची विकेट आपल्या खात्यात जमा केल्यावर शरयू कुलकर्णी हिने चक्क कोलांटी उडी मारत विकेट्सचं सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! स्मृती मानधनाची खिलाडू वृत्ती अन् मग शरयूचे खास सेलिब्रेशन
महिला महाराष्ट्र प्रिमिअर लीग स्पर्धेतील सोलापूर स्मॅशर्स विरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधना हिने चार चेंडूत फक्त एक धाव करून आपली विकेट गमावली होती. शरयू कुलकर्णीचा लेग स्टंपच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूनं स्मृतीच्या बॅटची गड घेतली अन् विकेटमागे दामिनी बनकर हिने तिचा झेल टिपला. शरयूच्या जोरदार अपीलनंतर मैदानाती अंपयारने स्मृतीला नाबाद ठरवले. पण स्मृती मानधनाने प्रामाणिकपणे आउट असल्याचे मान्य करत स्वत: मैदान सोडले. ही विकेट पडल्यावर शरयू कुलकर्णी हिने कोलांटी उडी मारून आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तिच्या सेलेब्रिशनसह अन् स्मृती मानधनाने दाखवलेली खिलाडूवृत्तीची भावनाही चर्चेचा विषय ठरत आहे.
सोलापूरच्या संघाने सहज जिंकली ही मॅच
स्मृती आणि शरयू कुलकर्णी यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो महिला महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेत शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर स्मॅशर्स यांच्यातील लढतीतील आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृतीच्या नेतृत्वाखा्लील रत्नागिरी जेट्स संघ निर्धारित २० षटकेही न खेळता १२० धावांत आटोपला होता. तेजल हसबनीसच्या नेतृत्वाखालील सोलापूर स्मॅशर्सच्या संघाने १६ व्या षटकात ८ विकेट्स राखून हा सामना जिंकल्याचे पाहायला मिळाले.