Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणजी करंडक स्पर्धेत 'महाराष्ट्र'चा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी; संघ अडचणीत

बडोदा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले

By धनंजय रिसोडकर | Updated: January 23, 2025 16:07 IST

Open in App

नाशिक: येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरु झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या रणजी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंतच्या सत्रापूर्वीच कर्णधार ऋतुराज गायकवाड बाद झाल्याने महाराष्ट्राचा डाव पहिल्या सत्रातच अडचणीत आला होता.

सकाळी बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. महाराष्ट्राच्या सलामीच्या जोडीतील नाशिकचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला याने सावध सुरुवात केली. पहिला तासाभराच्या खेळात ही सलामीची जोडी टिकली असल्याचे वाटू लागले असतानाच महाराष्ट्राच्या ३९ धावा झालेल्या असतानाच पवन शाह अवघ्या १२ धावांवर बाद झाला. तर चार चौकार लगावत सेट झाल्यासारखा खेळत असतानाच मुर्तुझा वैयक्तिक २२ धावांवर आणि संघाच्या ४१ धावा झाल्या असतानाच पायचीत होऊन तंबूत परतला.

त्यानंतर आलेला सिद्धेश वीर हा सेट होऊन चांगला खेळू लागला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड याने दोन चौके लगावत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. मात्र, उपहारापूर्वीच झेलबाद होत ऋतुराज वैयक्तिक १० धावांवर बाद झाल्याने नाशिककर क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. तसेच कर्णधार बाद झाल्याने उपाहारानंतर बडोद्याच्या गोलंदाजीची धार तिखट झाली. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणारा सिद्धेश वीरदेखील वैयक्तिक ४८ धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे दुसऱ्या सत्रातच महाराष्ट्राची धावसंख्या ४ बाद १२८ अशी झाली होती.

टॅग्स :रणजी करंडकनाशिकऋतुराज गायकवाडमहाराष्ट्र