Join us

Lowest Score in Cricket: अफलातून!! ८ धावांवर संघ 'ऑल आऊट'; अवघ्या ७ चेंडूत जिंकला सामना

कोणत्या संघाच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:09 IST

Open in App

Lowest Score in Cricket: क्रिकेटच्या खेळाचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. आता तुम्हीच सांगा, एखादा संघ कमीत कमी किती धावसंख्येवर 'ऑलआऊट' होऊ शकतो? या प्रश्नाचं एक धक्कादायक उत्तर नुकतंच एका सामन्यात मिळालं. नेपाळचा अंडर-19 महिला संघ अवघ्या ८ धावांवर ऑलआऊट झाला आणि विरोधी संघाने हे आव्हान अवघ्या दोन षटकांच्या आत पूर्ण केले. अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेच्या आशिया पात्रता स्पर्धेत नेपाळचा संघ संयुक्त अरब अमिरातीशी (UAE) खेळत होता. बागी येथे सुरू असलेल्या या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय त्यांच्यासाठी वाईट स्वप्नाप्रमाणे ठरला.

नेपाळकडून स्नेहा महारा हिने सर्वाधिक ३ धावा केल्या. तिला दहा चेंडू खेळता आले. संघाच्या एकूण ६ फलंदाजांना धावांचे खातेही उघडता आले नाही. युएईकडून माहिका गौरने ४ षटकांत पाच विकेट घेतल्या. महिकाने २ षटके मेडन टाकली आणि एकूण चार षटकांत केवळ २ धावा दिल्या. माहिकाशिवाय इंदुजा कुमारने ६ धावांत तीन बळी घेतले. तसेच, समायरालाही एक विकेट मिळाली. तिने सामन्यात फक्त हाच एक चेंडू टाकला होता. अशाप्रकारे नेपाळचा संपूर्ण संघ ८ षटकांत ८ धावांवर ऑलआऊट झाला.

प्रत्युत्तरात UAE ने हे लक्ष्य अवघ्या ७ चेंडूत म्हणजे १.१ षटकांत पूर्ण केले. त्यामुळे त्यांनी तब्बल ११३ चेंडू शिल्लक ठेवून लक्ष्य गाठले आणि एकही विकेट गमावली नाही. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर हा विक्रम तुर्कस्तानच्या नावावर आहे. तुर्कस्तानचा पुरुष संघ चेक प्रजासत्ताकाविरुद्ध अवघ्या २१ धावांवर ऑलआऊट झाला होता. हा लाजिरवाणा विक्रम ३० ऑगस्ट २०१९ रोजी झाला होता.

टॅग्स :नेपाळसंयुक्त अरब अमिरातीजरा हटके
Open in App