Join us  

पाकिस्तानी खेळाडूंचे नेतृत्व करणार युवराज सिंग; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग

LCT 2024: युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 3:42 PM

Open in App

भारताचा सिक्सर किंग म्हणून ओळख असलेला युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या युवराज सिंगची फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. श्रीलंकेत ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या लीजेंड्स क्रिकेट ट्रॉफीच्या (LCT) दुसऱ्या सत्रात न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्सने युवराज सिंगला त्यांच्या संघाचा आयकॉन खेळाडू बनवले आहे आणि त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडूही सहभागी होणार आहेत.

युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार बाबर आझमसह एकूण ५ पाकिस्तानी खेळाडू खेळताना दिसणार आहेत. २०११ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात युवराज सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बाबर आझम व्यतिरिक्त इमाम-उल-हक, नसीम शाह, आसिफ अली आणि मोहम्मद आमिर हे शिलेदार युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्समध्ये खेळताना दिसणार आहेत.

बाबर आझमसह अनेकांचा सहभाग याशिवाय अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान, रहमानउल्ला गुरबाज हे खेळाडूही या संघात आहेत. वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आणि श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिसा पाथिराना हे देखील न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्स संघात आहेत. युवराजला कर्णधारपद सोपवताना न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्सने आपल्या निवेदनात म्हटले की, युवराजच्या समावेशामुळे संघात कौशल्य आणि नेतृत्व क्षमता वाढेल, ज्यामुळे स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्सची तयारी मजबूत होईल.

दरम्यान, भारतीय क्रिकेटच्या महान खेळाडूंमध्ये युवराज सिंगचे नाव घेतले जाते. युवीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने ३०४ वन डे सामने खेळले असून एकूण ८७०१ धावा केल्या आहेत, ज्यात १४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. युवराजच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये १११ बळींची नोंद आहे. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराजने ५८ सामन्यात ११७७ धावा केल्या आहेत आणि २८ बळी घेण्यात त्याला यश आले.

टॅग्स :युवराज सिंगबाबर आजमभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानअफगाणिस्तान