Join us

टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघाच्या दिमाखदार विजयानंतर पाकिस्तानाचा माजी विकेट किपर बॅटर कामरान अकमल याने आपल्याच क्रिकेट बोर्डाला चपराक लगावली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:37 IST

Open in App

हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बांगलादेशच्या संघाला चारीमुंड्या चत केल्यावर या निकालाचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटताना दिसत आहेत. भारतीय संघाच्या दिमाखदार विजयानंतर पाकिस्तानाचा माजी विकेट किपर बॅटर कामरान अकमल याने आपल्याच क्रिकेट बोर्डाला चपराक लगावली आहे. ज्या बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानात शह दिला तो संघ भारतासमोर अगदी कमकूवत ठरला. 

पाकच्या माजी क्रिकेटरची PCB ला चपराक; म्हणाला, BCCI कडून काहीतरी शिका!

पाकिस्तानमधील ऐतिहासिक विजयासह अगदी तोऱ्यात भारतीय दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशचा टीम इंडियासमोर अजिबात निभाव लागला नाही. या निकालानंतर कामरान अकमल याने पाकिस्तानच्या संघाच्या पराभवाचे खापर थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) फोडले आहे. एवढेच नाहीतर  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून काहीतरी शिका, असा सल्लाही त्याने आपल्या बोर्डाला दिला आहे. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सर्वकाही ठिक असतं, तर पाकिस्तान क्रिकेटचे नुकसान झाले नसते, असे  कामरान अकमल याने म्हटले आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा बुक्का पाडल्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमधील वातावरण तापलं आहे, अशी परिस्थितीत निर्माण झाल्याचे दिसून येते.  

म्हणून भारतीय संघाचा क्रिकेट जगतात गाजावाजा, नेमकं काय म्हणाला पाकचा माजी क्रिकेटर?

कामरान याने आपल्या युट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये आपल्या क्रिकेट बोर्डाशी पंगा घेतला आहे. तो म्हणाला आहे की, प्रोफेशनली कसं वागायचं ते  पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं  बीसीसीआयकडून शिकायला पाहिजे. त्यांची टीम (Team India),  निवड समिती, कर्णधार आणि कोच यामुळे क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत आहे. जर आपण तेवढे चांगले असतो तर पाकिस्तान क्रिकेट आता आहे त्या परिस्थितीत नसते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील सदस्यांच्या अहंकारामुळे इथंल्या क्रिकेटचं मोठं नुकसान झालं आहे."

पाकिस्तान क्रिकेटची वाट लागलीये, बांगलादेश आधी त्यांना संघांनी दिलाय मोठा दणका

बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानच्या संघाला २-० अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान संघ अशा नामुष्कीचा सामना करत आहे. २०२२ मध्ये आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. त्यानंतर पाकिस्तानचा संघ वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात आला. इथंही त्यांचा निभाव लागला नाही. साखळी फेरीतच त्यांना गाठोडे बांधायला लागले होते. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकनं संघाने पाकिस्तानला धोबीपछाड दिली होती.   

टॅग्स :बीसीसीआयपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश