Join us

हार्दिक ऑन टॉप! 'चॅम्पियन' पांड्याला ICC ने दिली खुशखबर; वर्ल्ड कपमधील कामगिरीचे बक्षीस

हार्दिक पांड्याने ट्वेंटी-२० विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:28 IST

Open in App

Hardik Pandya News : भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाची बरोबरी करत आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अष्टपैलू कामगिरी करण्यात हार्दिकला यश आले. अंतिम सामन्यात त्याने घातक वाटणाऱ्या हेनरिक क्लासेनला बाहेरचा रस्ता दाखवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. याचाच फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाल्याचे दिसते. आताच्या घडीला हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. 

हार्दिकने विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करताना १५० च्या स्ट्राईक रेटने १४४ धावा केल्या तर ११ बळी घेण्यात हार्दिक पांड्याला यश आले. त्याने अंतिम सामन्यात क्लासेनला बाद करून सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. 

आयसीसी अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी

  1. हार्दिक पांड्या (भारत) - २२२ गुण
  2. वानिंदू हसरंगा (श्रीलंका) - २२२ गुण
  3. मार्कस स्टॉयनिस (ऑस्ट्रेलिया) - २१० गुण
  4. सिकंदर रझा (झिम्बाब्वे) - २१० गुण
  5. शाकिब अल हसन (बांगलादेश) - २०६ गुण

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात १६ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी हार्दिक पांड्यावर होती. त्याने चोख कामगिरी बजावताना डेव्हिड मिलर आणि कगिसो रबाडा यांना बाद केले. अखेरच्या चेंडूवर आफ्रिकेला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. भारत विश्वविजेता झाला होता त्यामुळे शेवटचा चेंडू म्हणजे केवळ औपचारिकता होती. हा चेंडू टाकत असताना हार्दिक भावुक झाला. विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करताना इतरही भारतीय शिलेदार भावुक झाले. 

टॅग्स :हार्दिक पांड्याआयसीसीभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024