Join us  

KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!

गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्ससाठी नायक बनला आहे...

By स्वदेश घाणेकर | Published: May 27, 2024 3:16 PM

Open in App

-स्वदेश घाणेकर

गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्ससाठी नायक बनला आहे... स्पष्टवक्तेपणामुळे गौतमच्या बाबतीत अनेक गैरसमज पसरले गेले किंवा ते पसरवले गेले... जे पटेल त्याबाजूने अन् पटत नाही त्याच्या विरोधात उभं राहण्याची धमक फार कमी क्रिकेटपटूंमध्ये आहे आणि त्यापैकी एक गौतम गंभीर... तो महेंद्रसिंग धोनीवर ( MS Dhoni) जळतो, विराट कोहलीचं यश त्याला पाहावत नाही, असे अनेक आरोप गंभीरवर केले गेले. पण, त्याने कधी त्या आरोपांना भीक घातली नाही... त्याच्या स्पष्ट बोलण्याचा नेहमीच चुकीचा अर्थ काढला गेला आणि त्यावरून मीडियाने अनेक बातम्या रंगवल्या.. या PR मीडियालाही गंभीरने अनेकदा सुनावले आहेच... पण, गंभीरने नेहमीच कृतीतून टीकाकारांना उत्तर देणे पसंत केले आणि कालचे जेतेपद हाही त्याचाच भाग होता...

गौतम गंभीर आणि KKR हे नातं फार जुनं आहे... २०१२ व २०१४ मध्ये गौतमने KKR ला दोन जेतेपद जिंकून दिली होती. तेव्हा गौतमसाठी KKR ने २.४ मिलियन डॉलर मोजले होते आणि एवढ्या रकमेचं दडपण घेतल्याचे गौतमने अनेकदा सांगितले आहे. सुरुवातीचे पर्व त्याच्यासाठी काही खास गेले नाही, परंतु संघ मालक शाहरुख खान याच्याशी स्पष्ट संवाद साधून त्याने दडपणाबाबत सांगितले. त्यावर शाहरुखने दाखवलेल्या विश्वासानंतर गौतमची कामगिरी सुधारली आणि संघाने दोन जेतेपदंही जिंकली. पण, गौतमच्या निवृत्तीनंतर KKR ला फक्त एकदाच फायनल गाठता आली. त्यामुळेच जेव्हा गौतमला २०२४ च्या आयपीएलसाठी पुन्हा संघात घेण्यासाठी शाहरुखने ब्लँक चेक त्याच्यासमोर ठेवला..

पैशांपेक्षा KKR संघासोबत असलेलं नातं गौतमला महत्त्वाचे वाटले आणि म्हणून त्याने लखनौ सुपर जायंट्ससोबत सुरु असलेला सुखाचा संसार सोडण्याचा निर्णय घेतला. गौतमचे संघात जंगी स्वागत झाले आणि एका कार्यक्रमात चाहत्याने चक्क आता KKR ला सोडून जाऊ नकोस, अशी रडत रडत विनंती केली. एवढं अतुट नातं गौतमचं KKR शी आहे. त्यानेही मेंटॉर म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि संघाचा १० वर्षांचा आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवला. सुनील नरीनला पुन्हा सलामीला खेळवण्याचा निर्णय, युवा खेळाडूंवर दाखवलेला विश्वास, सार्थ ठरला. आयपीएल लिलावातही गौतमने मिचेल स्टार्क ( २४.७५ कोटी), अंगक्रिश रघुवंशी ( २० लाख) व रमणदीप सिंग ( २० लाख) यांना आपल्या ताफ्यात घेतले आणि यांनी काय कमाल करून दाखवली हे सर्वांनी पाहिले. गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच बनणार का?आता खरी गंमत इथे सुरू होणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत... राहुल द्रविड आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्यामुळे BCCI ने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर, स्टीफन फ्लेमिंग, अँडी फ्लॉवर अशा परदेशी प्रशिक्षकांची नावे चर्चेत आहेत. पण, सचिव जय शाह यांनी एकाही ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूला विचारले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात गौतम गंभीरही या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. 

पण, KKR चे जेतेपद हे गौतम गंभीरच्या स्वप्नांच्या आड येऊ शकते... गौतम आणि KKR ने नाते घट्ट आहे आणि आता जेतेपद जिंकल्यानंतर ते त्याला या पदावरून मोकळं करतील असे वाटत नाही. तसे न झाल्यास गौतमला टीम इंडियाचा कोच होता येणार नाही. कारण, बीसीसीआयच्या नियमानुसार गौतमला टीम इंडियाचा कोच व्हायचे असेल तर त्याला KKR च्या मेंटॉरपदावरून मुक्त व्हावे लागेल. तसे न केल्यास त्याच्यावर हितसंबंध जपण्याचा आरोप होऊ शकतील. अशात गौतम गंभीर व KKR ची पुढची भूमिका ही टीम इंडियाच्या भविष्याच्या कोचसाठी महत्त्वाची ठरेल... 

टॅग्स :आयपीएल २०२४गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयराहुल द्रविड