Join us

करुण नायरला स्थान न मिळणे दुर्दैवी; भारतीय संघात स्थान रिक्त होणे कठीण: शुबमन गिल

Shubman Gill on Karun Nair Virat Kohli Rohit Sharma : इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:37 IST

Open in App

Shubman Gill on Karun Nair Virat Kohli Rohit Sharma : दीप सुधाकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विजय हजारे करंडक स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा विदर्भाचा अनुभवी फलंदाज करुण नायर याला भारताच्या वनडे संघात स्थान मिळू शकले नाही. या विषयी संघाचा उपकर्णधार शुभमन गिल याने मंगळवारी निराशा जाहीर केली आहे.

इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेआधी मंगळवारी व्हीसीए जामठा स्टेडियमवर सरावानंतर माध्यमांशी बोलताना गिल म्हणाला, 'स्थानिक सामन्यात धावा काढणाऱ्यांचा राष्ट्रीय संघात विचार व्हायला हवा. दुसरीकडे सत्य हेच आहे की मधली फळी चांगली खेळत आहे. अशावेळी नायरसाठी संघात स्थान निर्माण होणे थोडे कठीण आहे.' गिल पुढे म्हणाला की, विश्वचषकानंतर आम्ही केवळ तीन वनडे खेळलो. त्यामुळे खेळाडूंना अधिक संधी मिळू शकली नाही. विश्वचषकाच्या अंतिम लढतीचा अपवाद वगळता संपूर्ण संघ मागच्या दोन वर्षात चांगलाच खेळला.

  • सतत संधीची गरज

'माझ्या मते, स्थानिक सामन्यात दमदार ठरलेल्या खेळाडूसाठी राष्ट्रीय संघात स्थान बनायला हवे. खेळाडूंना वारंवार बदलल्याने भविष्यातील बलाढ्य संघ बांधणी होऊ शकणार नाही,' असे गिलने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

  • रोहित माहोल बनवतो...

रोहितने मागच्या दीड वर्षांत फलंदाजीसाठी उपयुक्त माहोल तयार केल्याचे सांगून गिल म्हणाला, 'पहिल्या चेंडूपासून रोहित गोलंदाजांवर तुटून पडल्यामुळे दुसऱ्या टोकावरील फलंदाजाला धावा काढणे सोपे होते.

  • अभिषेक, यशस्वीसोबत स्पर्धा नाही

अभिषेक शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सतत धावा काढत असल्याने मनात धाकधूक आहे का? असा प्रश्न करताच गिल म्हणाला, 'अभिषेक माझा बालपणाचा मित्र, तर यशस्वी संघातील घनिष्ठ मित्र आहे. दोघांचा खेळ पाहून मला आनंद होतो. आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही. देशासाठी खेळत असल्याने एकमेकांचा उत्साह वाढवितो.' नागपुरात एक फिरकीपटू, एका अष्टपैलूसोबत खेळण्याचे संकेत गिलने दिले आहेत.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमविल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले. रोहित आणि विराटच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली. पण माझ्या मते, एक मालिका गमाविल्याने संपूर्ण संघाच्या फॉर्मची व्याख्या करू नये. आम्ही ऑस्ट्रेलियात अपेक्षानुरूप खेळलो नाही, हे सत्य आहे. पण पुढे कामगिरी सुधारणारच नाही, असेही कुणी गृहीत धरू नये.'शुभमन गिल, उपकर्णधार

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५शुभमन गिलविराट कोहलीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ