Join us

रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीसंदर्भात कपिल पाजींनी व्यक्त केलेल मत चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 11:14 IST

Open in App

भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma )आणि स्टार क्रिकेट विराट कोहली (Virat Kohli) बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसले. कानपूर कसोटीत (Kanpur Test ) ही उणीव भरून काढण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील. या कसोटी सामन्याआधी कपिल पाजींनी दोघांच्या निवृत्तीसंदर्भातील मुद्यावर आपलं रोखठोक मत मांडलं आहे. भारतीय संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधारानं केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

टी-२० मधून निवृत्तीनंतर एकदिवसीय अन् कसोटीत किती दिवस दिसणार ही जोडी?

२०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी क्रिकेटच्या छोट्या प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. आता ही जोडी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा आनंद घेताना दिसते. पण एका प्रकारातून निवृत्त झाल्यामुळे उर्वरित क्रिकेट प्रकारात ही जोडी कधीपर्यंत खेळेल किंवा त्यांनी कधीपर्यंत खेळावे? हा प्रश्न सातत्याने चर्चेत येताना दिसतोय.  कपिल देव यांनी यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे.

कपिल पाजींच्या 'बोलंदाजी'त वयाचा आकडा अन् सचिनचा दाखला  

भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev)  यांनी क्रिकेटर्सनं कधीपर्यंत खेळावं यासंदर्भात भाष्य केले. 'माय खेल' वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले आहेत की, जोपर्यंत फिट असेल तोपर्यंत खेळाडूंनी खेळाचा मनसोक्त आनंद घ्यावा.  रोहित शर्मा आणि विराट कोहली (Kapil Dev on Rohit Virat Retirement) यांच्या निवृत्तीसंदर्भातील मुद्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी वयाचा आकड्यासह त्यांनी रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर यांचा दाखला दिला. रवी शास्त्री यांनी खूपच कमी वयात निवृत्ती घेतली होती. तर सचिन तेंडुलकरचं करिअर मोठं राहिलं, असा उल्लेखही त्यांनी केला. 

रोहित-विराट यांच्या निवृत्तीसंदर्भात नेमकं काय म्हणाले कपिल पाजी? 

कपिल देव म्हणाले की, फिटनेस टिकवून सर्वोत्तम कामगिरी करण्याची एक ठराविक वेळ असते. २६ ते ३४ हे वय कोणत्याही क्रिकेटरसाठी प्राइम काळ असतो. या काळात खेळाडू आपल्या फिटनेसप्रती सजग असतो. त्या दोघांनी (रोहित आणि विराट) वयाची ही मर्यादा पार केली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या  प्रत्येक प्रकारात खेळण्यासाठी त्यांना फिटनेची विशेष काळजी घ्यावी लागेल. एवढेच नाही तर शिस्त आणि वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, असे कपिल पाजींनी म्हटले आहे. विराट कोहली हा नोव्हेंबरमध्ये ३६ वर्षांचा होईल. दुसरीकडे रोहित शर्मा हा ३७ वर्षांचा आहे.

 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकपिल देवरोहित शर्माविराट कोहलीसचिन तेंडुलकर