Kane Williamson Clean Bowled Viral Video: क्रिकेटच्या मैदानावर विचित्र घटना घडत असतात. फलंदाजी असो वा गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, क्रिकेटच्या मैदानावर अनपेक्षित घटना घडताना दिसतात. आधुनिक क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात काहीना काही नवीन पाहायला मिळते, पण इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन ज्या प्रकारे बाद झाला, तसं क्वचितच पाहायला मिळते. केन विल्यमसनने ज्या प्रकारे विकेट गमावली, ते कुणालाही वाटले नसेल. केन विल्यमसन चक्क मॅथ्यू पॉटविरुद्ध स्वत:च्या पायाने चेंडू स्टंपवर मारून बाद झाला.
न्यूझीलंडच्या डावाच्या ५९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विल्यमसनने मॅथ्यू पॉटच्या चेंडूचा बचाव केला. चेंडू स्टंपच्या दिशेने जात होता. विल्यमसनला वाटले की त्याने चेंडू रोखला नाही तर तो स्टंपला लागेल. त्यामुळेच त्याने पायाने चेंडूचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला, पण घडले नेमके उलटे. विल्यमसन चेंडू विकेटच्या दिशेने जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या प्रयत्नात चुकून त्याने चेंडूला असा पाय लावला की चेंडू जोरात जाऊन स्टंपवर आदळला आणि तो त्रिफळाचीत झाला.
पाहा केन विल्यमनस बाद झाला तो व्हिडीओ-
केन विल्यमसनचे अर्धशतक हुकले
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केन विल्यमसन चांगल्या लयीत दिसला. विल्यमसनने वेगवान आणि फिरकी दोन्हीही गोलंदाजी चांगली खेळी. विल्यमसनने ८७ चेंडूंचा सामना करत एकूण ९ चौकारांसह ४४ धावा केल्या. मात्र, दुर्दैवाने अर्धशतक पूर्ण होण्याआधीच तो बाद झाला.