कोलकाता - फॉर्ममध्ये असलेला यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डनवर सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीची जागा घेणार असल्याची माहिती भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक रेयॉन टेन डोएशे यांनी बुधवारी दिली.
२४ वर्षांचा जुरेल आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळला असून, त्याने ५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४ शतके झळकाविली आहेत. मागच्या आठवड्यात बंगळुरू येथे द. आफ्रिका अ संघाविरुद्ध दोन्ही डावांत शतके ठोकली होती.
जुलैमध्ये मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे बाहेर असलेला ऋषभ पंत सध्या संघात परतला. अशा वेळी जुरेलचे स्थान कुठे असेल, असा प्रश्न उपस्थित झाला होता. डोएशे यांनी संघ संयोजनाबाबत स्पष्टपणे भाष्य करताना जुरेल सामना खेळणार असल्याचे सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, ‘माझ्या मते संघ संयोजनाचा वेध तुम्हालादेखील आला असेल. आपण जुरेल आणि पंत यांना बाहेर ठेवू शकतो, असे वाटत नाही.
स्थानिक सत्रात जुरेलने १४०, १, ५६, १२५, ४४, ६, १३१ आणि नाबाद १२७ धावा केल्या आहेत. विंडीजविरुद्ध मागच्या मालिकेत त्याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकाविले. कामगिरीमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.’
फलंदाज म्हणून सहभाग
नितीश रेड्डी याला बाहेर बसविण्याचा अर्थ असा की, जुरेल हा भारतीय अंतिम संघात फलंदाज या नात्याने असेल. रेड्डीला बाहेर बसविण्याबाबत विचारताच डोएशे यांनी सांगितले की, विंडीजविरुद्ध त्याला दोन्ही सामन्यांत संधी देण्यात आली होती. तो आता गुरुवारपासून दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी राजकोटमध्ये भारत 'अ' संघात सामील होणार आहे.
कुलदीपऐवजी अक्षर पटेल
भारतीय संघातील लवचिकतेसंदर्भात विचारताच फिरकी अष्टपैलू गोलंदाजांना संधी असल्याचे त्यांचे मत आहे. वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना खेळाविल्यास संघाला अतिरिक्त फलंदाजही मिळतो. कुलदीप ऐवजी अक्षर पटेल याची अंतिम संघात वर्णी लागेल, असे संकेतही डोएशे यांनी दिले.
कट्स असलेली बॅट...
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या हातात जी कट्स असलेली बॅट आहे, तिचा वापर केवळ सराव सत्रांदरम्यानच केला जातो. या बॅटला शॅडो बॅट किंवा हाय रेझिस्टन्स बॅट असेही म्हणतात.
याचा मुख्य उद्देश फलंदाजाची टायमिंग, संतुलन, फुटवर्क आणि फटक्यांचे तंत्र सुधारणे, हा असतो.
या प्रकारच्या बॅटमध्ये अनेकदा प्लास्टिक किंवा फोमचा ब्लेड असतो. हा ब्लेड खऱ्या बॅटपेक्षा हलका किंवा काही वेळा जड बनवला जातो, जेणेकरून स्नायूंचे नियंत्रण वाढेल.