Joe Root, 10000 Runs in Test Cricket: इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूटने रविवारी इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात जो रूटने आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पाही गाठला. अशी कामगिरी करणारा जो रूट हा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. त्याआधी केवळ अॅलिस्टर कुकलाच अशी कामगिरी करता आली आहे.
लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला तो जो रूटचा विक्रम. जो रूटकडून कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर हा त्याचा पहिलाच कसोटी सामना होता. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील पहिल्याच कसोटीत रूटने हा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा जो रूट हा केवळ ३१ वर्ष १५७ दिवसांचा आहे. विशेष बाब म्हणजे इंग्लंडसाठी पहिल्या दहा हजार कसोटी धावा करणाऱ्या अॅलिस्टर कुकने देखील वयाच्या ३१ वर्षे १५७ दिवसांतच हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
जो रूटने आतापर्यंत ११३ कसोटी सामन्यात ४९.५७च्या सरासरीने १० हजार ०१५ धावा केल्या आहेत. २६ शतके आणि ५३ अर्धशतके यांच्या जोरावर त्याने ही किमया साधली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २५४ हा त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम स्कोअर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
1. सचिन तेंडुलकर- 15921
2. रिकी पाँटिंग- 13378
3. जॅक कॅलिस- 13289
4. राहुल द्रविड- 13288
5. एलिस्टर कुक- 12472
6. कुमार संगकारा- 12400
7. ब्रायन लारा- 11953
8. शिवनारायण चंद्रपाल- 11867
9. महेला जयवर्धने- 11814
10. एलन बॉर्डर- 11174
11. स्टीव्ह वॉ- 10927
12. सुनील गावस्कर- 10122
13. युनूस खान - 10099
14. जो रूट- 10015