ब्रिसबेन - भारताची स्टार फलंदाज जेमिमा राॅड्रिग्जने आपली सहकारी स्मृती मानधनासोबत राहण्यासाठी ऑस्ट्रेलियातील डब्ल्यूबीबीएलच्या (महिला बिग बॅश लीग) उर्वरित सत्रात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मृतीचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. जेमिमा काही दिवसांपूर्वी स्मृतीच्या लग्नासाठी भारतात परतली होती. सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर तिला ब्रिसबेन हीट संघात परत जाऊन उर्वरित सामने खेळायचे होते. मात्र, लग्नापूर्वीच स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यामुळे विवाह स्थगित करण्यात आला. त्यानंतर जेमिमा राॅड्रिग्जने तिच्यासोबत भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला.
ब्रिसबेन हीटने एका निवेदनात सांगितले की, ‘जेमिमा राॅड्रिग्जने ऑस्ट्रेलियातील डब्ल्यूबीबीएलच्या उर्वरित सत्रातून मुक्त करण्याची विनंती केली होती. संघाने तिची विनंती मान्य केली आहे. होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यानंतर १० दिवसांपूर्वी जेमिमा राॅड्रिग्ज भारतात परतली होती. कारण, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार तिला स्मृती मानधनाच्या लग्नाला उपस्थित राहायचे होते.’