Jason Holder Bowling Video: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डर हा सर्वोत्तम टी२० खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याची उंची सामान्य क्रिकेटपटूंपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणूनच त्याच्याकडून लांब आणि उत्तुंग षटकार मारण्याची अपेक्षा केली जाते. तो त्या अपेक्षा पूर्ण करतो. त्याची गोलंदाजीदेखील प्रभावी आहे. होल्डर सध्या त्याच्या गोलंदाजीमुळे आणि मुख्यत: एका विशिष्ट चेंडूमुळे क्रिकेट जगतात चर्चेत आला आहे. होल्डर सध्या ILT20 लीगमध्ये खेळत आहे. तो दुबई कॅपिटल्सचा सामना करणाऱ्या अबू धाबी नाईट रायडर्सचा भाग आहे. या सामन्यात होल्डरने असा चेंडू टाकला की सारेच अवाक् झाले. फलंदाज किंवा होल्डरच्या संघालाही घडलेला प्रकार काही काळ समजू शकला नाही आणि अखेर साऱ्यांनाच हसू अनावर झाले.
चेंडू चौथ्या स्लिपमध्ये पोहोचला
जेसन होल्डर दुबई कॅपिटल्सविरुद्ध गोलंदाजी करत होता. एका षटकात, होल्डर गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा चेंडू त्याच्या हातातून निसटला घसरला आणि उंच उडून थेट चौथ्या स्लिपमध्ये गेला. चेंडू फलंदाज किंवा यष्टीरक्षकापर्यंत पोहोचलाच नाही. चेंडू थेट चौथ्या स्लिपच्या जागेवर जाऊन पडला. हे ऐकून होल्डर स्वतः आश्चर्यचकित झाला. तो स्वतःच घडलेल्या प्रकारावर हसू लागला. चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून बराच वर गेल्याने पंचांनी तो नो बॉल दिला. घडलेला प्रकार पाहून सारेच थक्क झाले.
व्हिडिओ व्हायरल
होल्डरच्या या चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कसे घडले याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. चाहतेही मजेदार कमेंट करत आहेत. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अबू धाबीने हा सामना ५० धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना संघाने सात गडी गमावून १५८ धावा केल्या. दुबई कॅपिटल्स १६.२ षटकांत १०८ धावांवर ऑलआउट झाला.