Gautam Gambhir Mahakaleshwar Temple : भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर शेवटचा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवली. आता टीम इंडिया युएईमध्ये ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भस्म आरती करताना दिसले. गंभीर संपूर्ण कुटुंबासह महाकालच्या दर्शनासाठी आला होता. आरती करतानाचा त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
आरतीनंतर गंभीर काय म्हणाला?
आरतीनंतर गौतम गंभीरने एएनआयशी बोलताना म्हटले की, मी तिसऱ्यांदा महाकालेश्वर मंदिरात आलो आहे आणि माझे कुटुंबही आज माझ्यासोबत आले आहे. देवाचे आशीर्वाद संपूर्ण देशावर राहोत अशी मी प्रार्थना केली. आशिया कपबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया या स्पर्धेत आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी युएई विरुद्ध खेळेल, त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी सामना करेल. १९ सप्टेंबर रोजी भारतीय संघ ओमानला आव्हान देईल. आम्ही चांगली कामगिरी करू, अशी आशा गंभीरने व्यक्त केली.
गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा टी२० मध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट
गौतम गंभीर भारताचे मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, टीम इंडियाचा टी२० मध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याच्या आगमनानंतर भारताने १५ टी२० सामने खेळले आहेत, त्यापैकी १२ जिंकले आहेत. टीम इंडियाने फक्त २ सामने गमावले आहेत तर १ सामना बरोबरीत सुटला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर टी२० मालिका जिंकली तर बांगलादेश आणि इंग्लंडला घरच्या मैदानावर हरवले.