Join us

इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता

Ishan Kishan News: इशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेरच आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:06 IST

Open in App

भारतीय संघाबाहेर बराच काळ असलेला विकेटकीपर फलंदाज इशान किशन याचा आज (१८ जुलै) त्याचा २७वा वाढदिवस साजरा करत आहे. याचदरम्यान त्याच्यासाठी एक वाईट बातमी येत आहे. त्याला आणखी एका संघातून वगळले जाऊ शकते. इशान किशनने अलीकडेच इंग्लंडमध्ये नॉटिंगहॅमशायरकडून काउंटी क्रिकेट खेळले. या काळात त्याने दोन सामने खेळले आणि दोन्हीमध्ये त्याने अर्धशतक केले. तरीही, त्याला एका संघातून वगळण्याची तयारी सुरू आहे. इशान किशनला IPL 2026 आधी मोठा धक्का बसू शकतो असे मानले जात आहे. कारण काव्या मारनचा SRH संघ इशानला संघातून वगळू शकते अशी बातमी आहे.

काव्या मारन घेणार मोठा निर्णय

IPL 2025 मध्ये काव्या मारनचा संघ सनरायझर्स हैदराबादने (SRH) इशान किशनला ११.२५ कोटी रुपयांची बोली लावून संघात समाविष्ट केले. या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात इशान किशनने शानदार शतक झळकावले. परंतु त्यानंतर त्याच्या बॅटमधून फार धावा निघाल्या नाहीत. संपूर्ण हंगामात तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला. या कारणास्तव, SRH संघ त्याला पुढल्या लिलावापूर्वी रिलीज करू शकतो. इशान किशनने IPL 2025 मध्ये SRH साठी १४ सामने खेळले आणि १३ डावांमध्ये ३५.४० च्या सरासरीने ३५४ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट होते. पण आता त्याच्यावर संघातून वगळण्याची तलवार लटकत आहे. त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला संघात आणण्याची तयारी सुरू आहे. अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.

काउंटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी

आयपीएल २०२५ नंतर, इशान किशन काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला. त्याने नॉटिंगहॅमशायरकडून दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यांमध्ये शानदार अर्धशतके झळकावली. इशानने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायरविरुद्ध पहिला सामना खेळला. यामध्ये त्याने ८७ धावा केल्या. तर सोमरसेटविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या.

शेवटचा सामना डिसेंबर २०२४ मध्ये...

इशान किशन सध्या टीम इंडियाच्या कोणत्याही फॉरमॅटचा भाग नाही. त्याने डिसेंबर २०२४ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर, वैयक्तिक कारणांमुळे तो संघापासून वेगळा झाला आणि तेव्हापासून पुनरागमनाची वाट पाहतोय. यादरम्यान, इशान किशनला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही वगळण्यात आले आहे.

टॅग्स :इशान किशनसनरायझर्स हैदराबादभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ