India vs New Zealand, 2nd T20I : इशान किशनचा शानदार शो अन् सूर्यकुमार यादवच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात धमाकेदार विजय नोंदवला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकात २०८ धावा करत टीम इंडियासमोर २०९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना धावफलकावर ६ धावा असताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोन्ही सलामीवीर माघारी फिरले. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव जोडी जमली. दोघांनी शतकी भागीदारीसह न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. एवढेच नाहीतर भारतीय संघाने ७ विकेट्स राखून १४.२ षटकात सामना संपवत टी-२० मधील सर्वात वेगवान विजयाचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाचा विक्रमी विजय; पाकिस्तानचा विक्रम मोडला
२०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू राखून सामना संपवण्याचा रेकॉर्ड याआधी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पाहायला मिळाला होता. गतवर्षी पाकिस्तानच्या संघाने ऑकलंडच्या मैदानात २०५ धावांचा पाठलाग करताना १६ व्या षटकात मॅच संपवली होती. पाकिस्तानचा हा विक्रम टीम इंडियाने मोडीत काढत टी-२० मध्ये सर्वात जलदगतीने २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. भारतीय संघाने २८ चेंडू राखून रायपूरचं मैदान मारलं.
IND vs NZ : बॅट हातून निसटली; पण ग्रीप नाही सुटली! इशान किशनने शानदार फिफ्टीसह मैफिल लुटली
इशान किशनसह सूर्याचा जलवा
धावांचा पाठलाग करताना इशान किशन याने ४ चौकार आणि ११ चौकाराच्या मदतीने ३२ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. त्याने २३७.५० च्या स्ट्राइक रेटनं धावा करताना कर्णधार सूर्यकुमार यादवच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचली. तो बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवनं शिवम दुबेच्या साथीनं सामना संपवला. सूर्या आणि शिवम दुबेनं चौथ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८१ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवनं ३७ चेंडूत ४ षटकार आणि ९ चौकाराच्या मदतीने २२१.६२ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ८२ धावांची नाबाद खेळी केली. शिवम दुबेनं १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २०० च्या स्ट्राइक रेटनं ३६ धावा केल्या.