रायपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात २०९ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. संघ अडचणीत असताना इशान किशन याने आपल्या शानदार शो दाखवून देत मैफिल लुटली. तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना त्याच्या हातून बॅट निसटल्याचेही पाहायला मिळाले. पण त्यानंतरही आत्मविश्वासानं फटकेबाजी करत या पठ्ठयानं आंतरराष्ट्रीय टी-२० मधील ७ वे अर्धशतक झळकावले. अवघ्या २१ चेंडूत त्याने अर्धशतक साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ अडचणीत असताना इशान- सूर्याची शतकी भागीदारी
भारतीय संघाने २०० पारच्या लढाईत अवघ्या ६ धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर इशान किशन याने आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश केला. तिसऱ्या विकेटसाठी त्याने कर्णधार सुर्यकुमार यादवच्या साथीनं ४८ चेंडूत १२२ धावांची दमदार भागीदारी रचत टीम इंडियाला भक्कम स्थितीत आणले.
हर्षित राणाचा कहर! न्यूझीलंडच्या धाकड फलंदाजासाठी ठरतोय कर्दनकाळ; सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल
शतक हुकले, पण मॅच सेट करणारी खेळी करून परतला
जवळपास तीन वर्षांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाल्यावर त्याने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. शानदार अर्धशतकी खेळीनंतर तो शतकही अगदी सहज झळकावेल, असे वाटत होते. पण ७६ धावांवर इश सोधीनं त्यांच्या खेळीला ब्रेक लावला. त्याने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २३७.५० च्या स्ट्राइक रेटनं सामना टीम इंडियाच्या बाजूनं सेट करणारी खेळी केली.