Join us  

Ruturaj Gaikwad, IND vs IRE : ऋतुराज गायकवाड फलंदाजीला का नाही आला?; हार्दिक पांड्याच्या उत्तरानं वाढलं टेंशन

India vs Ireland 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:45 AM

Open in App

India vs Ireland 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. आयर्लंडच्या ४ बाद १०८ धावांचा टीम इंडियाने ९.२ षटकांत ३ विकेट्स गमावून यशस्वी पाठलाग केला. पावसामुळे ही लढत १२-१२ षटकांची खेळवण्यात आली आणि कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीला बोलावले होते. या सामन्यात ऋतुराज गायकवाड व इशान किशन ही जोडी सलामीला येणे अपेक्षित होती, परंतु दीपक हुडाने इशानसह ओपनिंग केली. ३ विकेट पडूनही ऋतुराज फलंदाजीला न आल्याने नेटिझन्स नाराज झाले होते. पण, तो फलंदाजीला का आला नाही, याचा उलगडा हार्दिकनं सामन्यानंतर केला.

हॅरी टेक्टरच्या ३३ चेंडूंतील ६४ धावांच्या जोरावर आयर्लंडने १०८ धावांपर्यंत मजल मारली. भुवी, हार्दिक, आवेश व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताच्या इशान किशनने ११ चेंडूंत २६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर बाद झाला. हार्दिकनेही १२ चेंडूंत २४ धावा केल्या. दीपक २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर  नाबाद राहिला. ऋतुराजच्या पोटरीत दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजीला आला नाही, असे हार्दिकने सामन्यानंतर सांगितले. ऋतुराजने क्षेत्ररक्षण केले, परंतु तो फलंदाजीला येऊ शकला नाही. अशात त्याचे दुसऱ्या सामन्यात खेळणेही अनिश्चित मानले जात आहे. संजू सॅमसनला उद्या होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-२०त संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात हार्दिक पांड्यामुळे ६३ वर्षांपूर्वीचा योग जुळून आला. २०२२ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ४ खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. हार्दिक पांड्या हा यंदाच्या वर्षात संघाचे नेतृत्व करणारा पाचवा कर्णधार असेल. असा योगायोग ६३ वर्षांपूर्वी घडला होता. १९५९ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व ५ खेळाडूंनी केले होते. हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मांकड, गुलाबभाई रामचंद आणि पंकज रॉय या पाच कर्णधारांनी एकाच वर्षी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर या वर्षी रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे पाच जण संघाचे कर्णधार होणार आहेत. 

टॅग्स :ऋतुराज गायकवाडभारतआयर्लंडहार्दिक पांड्यासंजू सॅमसन
Open in App