Join us

IPL 2024 MI vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! अखेर 'सूर्या'ची एन्ट्री; पंतने २ तर हार्दिकने केले ३ बदल

IPL 2024 MI vs DC Live Score Card: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:05 IST

Open in App

IPL 2024 MI vs DC Live Match Updates | मुंबई: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. यंदाच्या हंगामातील विसावा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा यजमान संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. आजचा सामना जिंकून विजयाचे खाते उघडण्याचे आव्हान हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्ससमोर आहे. आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने आजच्या सामन्यासाठी दोन तर मुंबईने तीन बदल केले आहेत. बहुचर्चित अशा सूर्यकुमार यादवची अखेर संघात एन्ट्री झाली आहे. (IPL 2024 News)

हार्दिक पांड्याने नमन धीर, क्वेना मफाका आणि ट्रॅव्हिस ब्रेव्हिसच्या जागी सूर्यकुमार यादव, रोमॅरिओ शेफर्ड आणि मोहम्मद नबीला संधी दिली. तर, दिल्ली कॅपिटल्सकडून झाय रिचर्डसन आणि कुमार कुशगरा पदार्पणाचा सामना खेळत आहेत. 

मुंबई इंडियन्सचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, मोहम्मद नबी, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, पियुष चावला, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, रोमॅरिओ शेफर्ड.  

दिल्ली कॅपिटल्सचा संघ -रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाय रिचर्डसन, एनरिक नॉर्तजे, इशांत शर्मा, खलील अहमद. 

मुंबईला आपल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आजचा दिल्लीविरूद्धचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईसाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ देखील संघर्ष करत आहे. दिल्ली आणि मुंबई दोन्हीही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. दिल्लीला १ सामना जिंकण्यात यश आले तर मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. पंतच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. दिल्ली आताच्या घडीला नवव्या तर मुंबई दहाव्या स्थानावर आहे. 

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सहार्दिक पांड्याआयपीएल २०२४सूर्यकुमार अशोक यादव