इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय अन् श्रीमंत लीग आहे. आतापर्यंतच्या १८ हंगाम अनेक खेळाडू या स्पर्धेमुळे रात्रीत करोडपती झाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक हंगामात खेळाडूंशिवाय या स्पर्धेतील वादही गाजले आहेत. २००८ च्या पहिल्या वहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याचा पंजाब किंग्स) या दोन संघातील सामन्यात हरभजन सिंग याने रागाच्या भरात एस श्रीसंतला थप्पड मारली होती. १७ वर्षांनी IPL संस्थापक आणि माजी IPL अध्यक्ष ललित मोदी यांनी मैदानात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅच संपली, सर्व कॅमेरे बंद झाले, मग हा व्हिडिओ कॅप्चर कसा झाला?
बियॉन्ड २३ क्रिकेट पॉडकास्टमध्ये ऑस्ट्रेलियन वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार मायकल क्लार्कसोबत गप्पा गोष्टी करताना ललित मोदी यांनी मैदानात जे घडलं त्याचा आतापर्यंत कुणीही न पाहिलेला व्हिडिओ शेअर केलाय. सामन्यानंतर सगळं कॅमेरे बंद असताना माझा सुरक्षा कॅमेरा चालू होता. त्यात श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यातील वादाची घटना कॅप्चर झाली होती, ही गोष्टही ललित मोदींनी व्हिडिओ फुटेज दाखवताना सांगितली.
भज्जीच्या मनात खदखद; श्रीसंतच्या लेकीच्या नजरेत आजही विलेन
काही दिवसांपूर्वीच हरभजन सिंग याने माजी जलगदती गोलंदाज एस श्रीसंतसोबत मैदानात जे वागलो ते चुकीचं होते, अशी कबुली दिली होती. मी २०० वेळा याबद्दल माफी मागितलीये, असे सांगताना माजी फिरकीपटूनं श्रीसंतच्या लेकीच्या नजरेत मी खलनायक आहे, ही गोष्टही शेअर केली होती. तुम्ही माझ्या बाबांना मारलं, मी तुमच्याशी बोलणार नाही, असे म्हणत भज्जीबद्दल चिमुकल्या मुलीनं नाराजी व्यक्त केली होती. तिच्या या भावना मनावर घाव घालणाऱ्या होत्या, असेही हरभजन सिंग म्हणाला होता.