Rajasthan Royals vs Chennai Super Kings, 3rd Match : आयपीएल २०२६ च्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई किंग्सचा धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रविंद्र जडेजाच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या १२७ धावांवर रोखले. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीचं धमाकेदार अर्धशतक आणि सलामीवीर यशस्वी जैस्वालसह कर्णधार रियान परागच्या कडक बॅटिंगच्या जोरावर राजस्थानच्या संघाने १२८ धावांचे टार्गेट १३ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ८ विकेट्स राखून पार केले. आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान रॉयल्सचा हा सर्वात मोठा विजय ठरला. याउलट चेन्नई सुपर किंग्सवर सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जेमी ओव्हरटन वगळता चेन्नईच्या एकाही बॅटरचा लागला नाही निभाव
रियान परागनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर राजस्थानच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्सच्या आघाडीला सुरुंग लावला. नांद्रे बर्गर याने संजू सॅमसन याला अवघ्या ६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जोफ्रा आर्चर पिक्चरमध्ये आला त्याने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला ६ धावांवर माघारी धाडले. युवा आयुष म्हात्रेला नांद्रे बर्गरनं खातेही उघडू दिले नाही. संदीप सर्मानं मॅथ्यू शॉर्टला अवघ्या दोन धावांवर माघारी धाडले. रवींद्र जडेजाने एकाच षटकात सरफराज खान १७ (१२) आणि शिवम दुबे ६ (४) धावांवर बाद करत चेन्नईची अवस्था बिकट केली. अवघ्या ५७ धावांवर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ६ विकेट्स गमावल्या होत्या. चेन्नईकडून धोनीच्या जागी पदार्पणाची संधी मिळालेल्या कार्तिक शर्मानं तग धरण्याचा प्रयत्न केला. पण तोही १८ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकात जेमी ओव्हर्टन याने ३६ चेंडूत केलेल्या ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने १९.४ षटकात १२७ धावांवर आटोपला.
वैभव सूर्यवंशीची स्फोटक खेळी; यशस्वी-रियान जोडीनं १३ व्या षटकात संपवली मॅच
चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी पहिल्या षटकापासून चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजावर तुटून पडला. त्याने १७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी करत चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. ध्रुव जुरेल ९ चेंडूत १८ धावा करुन परतल्यावर सलामीवीर यशस्वी जैस्वाल ३६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावा आणि रियान परागनं ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १४ धावांसह १३ व्या षटकातील पहिल्या चेंडूवरच मॅच संपवली.