Tilak Varma Retired Out Rule Mumbai Indians, IPL 2025 MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक पद्धतीने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि एडन मार्करमच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने २०३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला केवळ १९१ धावाच करता आल्या. या सामन्यात एक विचित्र गोष्ट दिसली. प्रतिभावान डावखुरा फलंदाज तिलक वर्मा फलंदाजी करत असताना, मोक्याच्या क्षणी मैदानाबाहेर गेला. त्याला रिटायर्ड आऊट करण्यात आले. त्यानंतरही Hardik Pandya च्या मुंबई संघाला सामना जिंकता आलाच नाही. जाणून घेऊया रिटायर्ड आऊट काय आहे? त्याचे नियम काय सांगतात?
'रिटायर्ड आऊट' म्हणजे काय?
IPL 2025च्या मॅच प्लेइंग कंडिशन नियमावलीमध्ये रिटायर्ड आऊटबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कलम २५.४ नुसार...
- २५.४.१ - चेंडू डेड झाल्यानंतर फलंदाज त्याच्या डावात कधीही क्रिकेटमधून 'रिटायर्ड' होऊ शकतो. पंचांना फलंदाजाच्या 'रिटायर्ड' होण्याचे कारण सांगावे लागते.
- २५.४.२ - जर एखादा फलंदाज आजारी पडला, दुखापत झाली किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे 'रिटायर्ड' झाला तर तो फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. पण जर एखादा फलंदाज त्यानंतर फलंदाजीला आला नाही, तर अखेरच्या स्कोअरकार्डवर त्याला 'रिटायर्ड नॉट आऊट' अशी नोंद केली जाते.
- २५.४.३ - जर एखादा फलंदाज कलम २५.४.२ व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव 'रिटायर्ड' झाला, तर तो फलंदाज प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या संमतीनेच फलंदाजीला पुन्हा येऊ शकतो. जर तो परत आला नाही तर अखेरच्या स्कोअरकार्डवर त्याची 'रिटायर्ड आऊट' अशी नोंद केली जाते.
- २५.४.४ - कलम २५.४.२ आणि २५.४.३ लक्षात घेत, फलंदाज विकेट पडल्यानंतर किंवा दुसरा फलंदाज 'रिटायर्ड' झाल्यानंतरच पुन्हा खेळायला येऊ शकतो.
आयपीएलमध्ये निवृत्त झालेले खेळाडू
- रविचंद्रन अश्विन विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे, २०२२.
- अथर्व तायडे विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, धर्मशाळा, २०२३.
- साई सुदर्शन विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद, २०२३.
- तिलक वर्मा विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, लखनौ, २०२५.