Ashish Nehra Prasidh Krishna Plan, Sanju Samson Wicket IPL 2025: शुबमन गिलच्या गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर तब्बल ५८ धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या ८२ धावा, शाहरूख खानच्या ३६ धावा आणि जॉस बटलरच्या ३६ धावांच्या बळावर गुजरात संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव शिमरॉन हेटमायरचे अर्धशतक (५२), संजू सॅमसनच्या ४१ धावा आणि रियान परागच्या २६ धावांच्या जोरावर केवळ १५९ धावांवर संपुष्टात आला. संजू सॅमसन फलंदाजी करत असताना, राजस्थानची धावगती अप्रतिम होती. त्यावेळी गुजरातचा कोच आशिष नेहराने सांगितलेल्या मास्टरप्लॅनमुळे सामना फिरला.
राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या दोन विकेट्स पटपट गेल्या. त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्या भागीदारी झाली. ही भागीदारी तोडणे गरजेचे होते. त्यावेळी आशिष नेहराने मैदानाबाहेर उभे राहून असिस्टंट जयंत यादवला कानात काहीतरी सांगितले. तोच संदेश जयंत यादवने दोन षटकांच्या दरम्यान प्रसिध कृष्णाला सांगितला. त्यानंतर प्रसिध कृष्णा स्वत: गोलंदाजीला आला आणि त्याने प्लॅनिंग प्रमाणे गोलंदाजी करून संजू सॅमसनला बाद केले.
-----------
रियान परागबाबत वादग्रस्त निर्णय
सातव्या षटकात रियान परागच्या रुपात राजस्थानच्या संघाला तिसरा धक्का बसला. या षटकातील चौथ्या चेंडूवर रियान परागला पंचांनी यष्टीमागे झेलबाद ठरवले. रियान अंपायरच्या निर्णायवर नाखुश दिसला. चेंडू बॅटची कड घेऊन गेलेला नाही, असे त्याचे म्हणणे होते. राजस्थानने रियानची विकेट वाचवण्यासाठी DRS घेतला, पण अखेर निर्णय गुजरातच्या बाजूने लागला. त्यामुळे रियान परागची खेळी १४ चेंडूत २६ धावांवर संपुष्टात आली.