बंगळुरू - दोन पराभवांनंतर तिसऱ्या सामन्यात विजय नोंदवून खाते उघडणारा राजस्थान संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याला विजयानंतर बीसीसीआयने अंतिम फिटनेस चाचणीसाठी तातडीने 'सेंटर ऑफ एक्सलन्स' येथे पाचारण केले. त्याच्या क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षण कौशल्यावर अंतिम निर्णय होईल. त्यानंतरच तो आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करू शकेल. पहिल्या तीन सामन्यांत संजू फलंदाज म्हणून खेळला. ध्रुव जुरेलने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली. संजू फिटनेस चाचणीत पास झाल्यास तो यष्टिरक्षण करू शकतो आणि कर्णधाराच्या भूमिकेत पुन्हा दिसू शकतो. संजूच्या दुखापतीमुळे राजस्थानने पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान परागला कर्णधार केले होते. संजूच्या बोटाची दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे आणि यष्टिरक्षणासाठीही तंदुरुस्त असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याला होकार घ्यावा लागेल.
संजूने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत ६६ (वि. हैदराबाद), १३ (वि. कोलकाता) आणि २० (वि. चेन्नई) धावा केल्या आहेत. तो या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला.राजस्थानचा पुढील सामना ५ एप्रिलला होणार आहे आणि बीसीसीआयकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच संजू कर्णधाराच्या भूमिकेत पुन्हा दिसू शकेल.