Rajasthan Royals vs Mumbai Indians, 50th Match : जयपूरच्या मैदानातील दमदार विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर काढले आहे. एवढेच नाही तर सलग सहाव्या विजयासह आपल्या खात्यात १४ गुण जमा करत मुंबई इंडियन्सच्या संघाने गुणतालिकेत अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. २०१२ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या संघाने जयपूरच्या मैदानात राजस्थानच्या संघाला मात दिलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आघाडीच्या फलंदाजांच्या फटकेबाजीनंतर MI च्या गोलंदाजांनीही केली हवा
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने सलामीवीर रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकासह सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी दोघांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सच्या संघासमोर २१८ धावांचे टार्गेट सेट केले होते. फलंदाजी करताना आघाडीच्या चारही फलंदाजांनी केलेल्या ४० पेक्षा अधिक धावा अन् त्यानंतर धावांचा बचाव करताना दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कर्ण शर्मा यांनी आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेत राजस्थानला अडचणीत आणले.
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
बॅटिंग वेळी सलामीवीरांच्या अर्धशतकासह सूर्या-हार्दिकचा जलवा
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सलामीवीर रायन रिकल्टन याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. त्याच्याशिवय रोहित शर्मानंही ३६ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ५३ धावांचे योगदान दिले. या दोघांनी आपली विकेट गमावल्यावर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. सूर्यानं २३ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकारासह ३ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी केली. या चौघांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या होत्या.
राजस्थानकडून आर्चरनं केल्या सर्वाधिक ३० धावा
२०० पारच्या लढाईत राजस्थानच्या बॅटर्संनी नांगी टाकली. आघाडीच्या फलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट गमावल्यामुळे RR चा संघ शंभरीच्या आतच गुंडाळतोय की, काय असे वाटत होते. पण जोफ्रा आर्चरनं २७ चेंडूत केलेल्या ३० धावांमुळे संघाने शंभरीचा टप्पा पार केला. बोल्टनं त्याची विकेट घेत मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. राजस्थानचा संघ १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ११७ धावांवर ऑल आउट झाला. यासह मुंबई इंडियन्सच्या संघाने १०० धावांनी विजय मिळवला.