एक्स्पर्ट कमेंट: अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
लखनौविरुद्ध शुक्रवारी झालेल्या आयपीएल लढतीत मुंबईने आपला फलंदाज तिलक वर्मा याला रिटायर्ड आउट केले. वर्मा वेगवान धावा काढण्याच्या लयीमध्ये नव्हता. धावा काढण्यात अडचण जाणवत होती. त्यामुळे आवश्यक धावगती वाढत चालली होती. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पांड्याने तिलकला रिटायर्ड आउट केले, पांड्याच्या या निर्णयावर वाद उद्भवला.
वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग या माजी खेळाडूंनी हार्दिकच्या या निर्णयावर टीका केली. या दोघांच्या मते, तिलक आवश्यक धावगतीने धावा काढत नव्हता, मात्र तो स्थिरावला होता. काही वेळात तो मनसोक्त फटकेबाजी करू शकला असता, त्याच्यात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. पण, मुंबईने हा सामना गमावला.
IPL: आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा
रिटायर्ड आउट म्हणजे काय?
क्रिकेटमध्ये रिटायर्ड आणि रिटायर्ड हर्ट हे भिन्न शब्द आहेत. रिटायर्ड हर्ट म्हणजे फलंदाजी करताना जखमी किंवा आजारी पडलेला फलंदाज तंबूत परत जातो, तेव्हा तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. रिटायर्ड आउट होणारा फलंदाज मात्र पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. हा प्रकार 'विकेट' मानला जातो. ही विकेट गोलंदाजांच्या खात्यात जात नाही. तिलक हा रिटायर्ड आउट होणारा पहिलाच फलंदाज नाही. रविचंद्रन अश्विन (२०२२), अथर्व तायडे (२०२३) आणि साई सुदर्शन (२०२३) हे आयपीएलमध्ये रिटायर्ड आउट झाले आहेत.
IPL: 'रिटायर्ड आऊट' म्हणजे काय? तिलक वर्मा पुन्हा फलंदाजीला येऊ शकला असता का
पांड्याला काय हवे होते...
हार्दिकची अपेक्षा अशी होती की, तिलकची जागा घेणाऱ्या फलंदाजाने झटपट खेळी करून संघाचा विजय साकारावा. पांड्याने सामन्यात ३५ धावा देत अर्धा संघ बाद केला. आपल्या कामगिरीवर पाणी फेरले जाऊ नये, मुंबईचा विजय व्हावा, असे त्याच्या मनात असावे. त्यामुळेच विजयासाठी हार्दिक उतावीळ झाला होता.
IPL: तिलक वर्माला 'रिटायर्ड आऊट' का केलं? हार्दिक म्हणाला- "त्यावेळी आम्हाला..."
दुधारी तलवार...
फलंदाजाला रिटायर्ड करणे हे दुधारी तलवारीसारखे असते. २०२२ ला रविचंद्रन अश्विन याने स्वतःला रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच त्याच्या निर्णयाची फारशी चर्चा झालेली नव्हती, पण आपल्या कृतीमुळे सामना गमावला की, टीकेची झोड उठू शकते, याची फलंदाजाला भीती असते. याप्रकरणी प्रशिक्षक आणि कर्णधार निर्णय घेतात. फलंदाजाला रिटायर्ड आउट करण्यासाठी संघाकडे काही डावपेच असावेत. लखनौविरुद्ध पांड्याचा विचार असा असेल की, १०-१२ चेंडूंत ३० धावा करायच्या, तर माझ्या वाट्याला ५-६ चेंडू येतील. त्यावर मी १५-१६ धावा काढू शकेन. त्यामुळे तिलकची बॅट तळपत नसल्याने त्याला रिटायर्ड आउट करण्यात आले. त्याचे स्थान घेणारा अन्य फलंदाज मोठे फटके मारून सामना जिंकवून देऊ शकतो, मात्र अशा प्रकारचे मनसुबे यशस्वी होतीलच याची खात्री नसते. हा एकप्रकारचा 'जर-तर'चा जुगार आहे.
Video: तिलक वर्माला मैदानाबाहेर पाठवताच सूर्यकुमार संतापला, अखेर कोचने काढली समजूत
आणखीही रिटायर्ड आउट होतील...
- माझ्या मते, रिटायर्ड आउट हा गुंतागुंत असलेला विषय आहे. आगामी काळात टी-२० मध्ये असे वारंवार घडू शकेल, क्रिकेटच्या या प्रकारात जय-पराजयाशिवाय तिसरा पर्याय नाही.
- कसोटीत सामना अनिर्णीत राहू शकतो. त्यामुळेच टी-२० मध्ये आणि विशेषतः आयपीएलमध्ये असे दृश्य वारंवार पाहायला मिळाल्यास नवल वाटू नये.
- टी-२० मध्ये फलंदाजापुढे स्थिरावण्यासाठी फारशी संधी नसते. वनडेत स्थिरावण्यासाठी एक-दोन षटके धावा काढल्या नाहीत, तरी फरक पडत नाही.
- त्यामुळे टी-२० मध्ये धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या फलंदाजाला प्रशिक्षक किंवा कर्णधार माघारी बोलावू शकतो.
- फलंदाज स्वतः देखील हा निर्णय घेऊ शकतो. हिट विकेट करून किंवा धावबाद होऊन परतण्याचाही फलंदाजाकडे पर्याय उपलब्ध असतो.