आयपीएलच्या १८ व्या हंगामात गुजरात टायटन्स (GT), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) या चार संघांनी प्लेऑफ्सचं तिकीट पक्के केले आहे. पण अव्वल दोनमध्ये राहून Qualifier 1 ची लढत कोण खेळणार ते अद्याप अस्पष्टच आहे. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या संघांमध्ये क्वालिफायर १ ची लढत खेळवण्यात येते. यातील विजेता थेट फायनल खेळतो तर पराभूत संघाला क्वालिफायर २ खेळून पुन्हा फायनल गाठण्याची संधी असते. त्यामुळेच चारमध्ये पोहचलेल्या संघामध्ये अव्वल दोन स्थानांची लढाई महत्त्वपूर्ण होते. सध्याच्या घडीला प्लेऑफ्समध्ये खेळणाऱ्या चारही संघांसाठी पहिल्या दोनमध्ये पोहचण्याची संधी आहे. १६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सलाही गुणतालिकेत अव्वल होण्याची संधी आहे. ते कसं शक्य होईल? MI चे कट्टर चाहतेही CSK ला चीअर करायला का तयार असतील? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...म्हणून CSK चा विजय MI च्या फायद्याचा
गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह सध्या सर्वात आघाडीवर आहे. रविवारी दुपारच्या सत्रात गुजरातचा संघ अहमदाबादच्या मैदानावर साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना खेळणार आहे. ते चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला भिडतील. गुणतालिकेत तळाला असलेल्या धोनीच्या संघाने आपला शेवटचा सामना जिंकला तर गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांवरच थांबेल. हा निकाल चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला अव्वल दोनमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. त्यामुळेच CSK चे कट्टर विरोधक असणारे MI चे चाहतेही या सामन्यात धोनीच्या संघाला चीअर करताना दिसतील.
CSK वाले जिंकले म्हणजे MI ची डाळ शिजली असंही नाही...
सोमवारी मुंबई इंडियन्सचा संघ पंजाब किंग्ज विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हे दोन्ही संघ साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जयपूरच्या मैदानावर खेळणार आहेत. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ १८ गुणांवर पोहचू शकतो. गुजरातचा संघ १८ गुणांवरच थांबला अन् मुंबई इंडियन्सच्या संघाने १८ गुणांपर्यंत मजल मारली तर दोन्ही संघ समान गुणावर असले तरी उत्तम रनरेटच्या जोरावर MI चा संघ आगेकूच करेल. दुसरीकडे पंजाब किंग्ज १७ गुणांवर राहिल्यामुळे हा संघ टॉप २ च्या शर्यतीतून बाहेर पडेल.
RCB ची लढतीत ट्विस्ट निर्माण झाले तर MI चा संघ ठरू शकतो टॉपर प्लेऑफ्समध्ये स्थान निश्चित करणारा आरसीबी संघही १३ सान्यानंतर १७ गुणांवर आहे. हा संघ लखनौविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून ते १९ गुणांपर्यंत पोहचू शकतात. जर RCB नं हा सामना गमावला तर गुजरातचा संघ CSK विरुद्धच्या पराभवानंतरही टॉप २ मध्ये दिसेल. पण या परिस्थितीत MI टॉपर ठरेल अन् क्वालिफायर १ च्या लढतीत MI vs GT अशी लढत पाहायला मिळेल.
GT अन् RCB दोन्ही संघांनी आपला सामना जिंकला तर काय?
जर GT नं आपला अखेरचा सामना जिंकला तर त्यांच्या खात्यात २० गुण जमा होतील. याचा अर्थ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा विजयास ते गुणतालिकेत टॉपला जातील. दुसरीकडे RCB ने आपला शेवटचा सामना जिंकला तर ते १९ गुणांवर पोहचतील. म्हणजे ते दुसरे स्थान पक्के करतील. या दोन संघातच क्वालिफायर १ ची लढत पाहायला मिळेल. मुंबई- पंजाब यांच्यातील निकाल काही असो या दोन संघात एलिमिनेटरचा सामना होईल.