Preity zinta Rishabh Pant, IPL 2025: पावसाच्या तडाख्यामुळे उशिरा सुरु झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा घरच्या मैदानावर पराभव झाला. पंजाब किंग्जच्या दमदार गोलंदाजीपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. पावसामुळे प्रत्येकी १४ षटकांचा सामना खेळवला गेला. टीम डेव्हिडच्या २६ चेंडूत नाबाद ५० धावांच्या जोरावर बंगळुरूने कशीबशी ९ बाद ९५ पर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचीही गाडी रुळावरून घसरली होती. पण नेहाल वढेराने १९ चेंडूत नाबाद ३३ धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर संघमालकीण प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पंजाबच्या विजयानंतर प्रितीची नेहमीच चर्चा रंगते. पण सध्या आणखी एका वेगळ्या विषयासंदर्भात तिच्या नावाची चर्चा सुरु आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार रिषभ पंत एका टॉक शो मध्ये म्हणाला होता की, पंजाब किंग्जकडे लिलावाच्या वेळी खूप पैसे होते. ते माझ्यावर बोली लावून मला विकत घेऊ शकले असते. मलाही तेच एक टेन्शन होतं पण मला त्या संघात जायचं नव्हतं. त्याच्या या विधानावर प्रिती झिंटाने प्रतिक्रिया दिल्याचा दावा गुर्लभ सिंग या युजरने @gurlabhsingh610 या आयडीवरून केला. "प्रिती झिंटा म्हणाली, आम्ही रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर अशा दोन्ही पर्यायांचा विचार केला होता. दोघांपैकी कुणालाही आम्ही संघात घेऊ शकलो असतो. पण आम्हाला चांगला क्रिकेट खेळणार खेळाडू हवा होता, केवळ मोठे नाव असलेला खेळाडू नको होता... म्हणून आम्ही श्रेयस अय्यरला संघात सामील करून घेतले," असा दावा त्याने केला.
पंजाब किंग्जची सहमालकीण प्रिती झिंटाने खरंच रिषभ पंतला थेट अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली का, असा साऱ्यांनाच प्रश्न पडला होता. पण प्रितीनेच याची 'पोलखोल' केली. युजरने केलेल्या दाव्यावर प्रितीने लिहिले, "मला माफ करा, पण हे साफ खोटं आहे. ही FAKE NEWS आहे."
दरम्यान, आयपीएलच्या लिलावामध्ये श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत दोघांवरही जोरदार बोली लागली. आधी श्रेयस अय्यरचे नाव लिलावासाठी पुकारण्यात आले. त्याला २६ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह पंजाब किंग्जने संघात स्थान दिले. त्यापाठोपाठ रिषभ पंतचे नाव पुकारण्यात आले. २० कोटींपर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात बोली लागली. पण अखेर २७ कोटींची अंतिम बोली लावून LSG ने रिषभ पंतला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.