Mumbai Indians And Delhi Capital Battle for IPL 2025 Playoffs :आयपीएलच्या १८ व्या हंगामात प्लेऑफ्समधील तीन संघ ठरल्यावर आता उर्वरित एका जागेसाठी दोन संघ शर्यतीत आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एक संघ प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणारा चौथा आणि शेवटचा संघ ठरेल. २१ मे रोजी दोन्ही संघ मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात एकमेकांविरुद्ध भिडणार असल्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर साधे गणित आहे ते म्हणजे वानखेडेचं मैदान मारा अन् प्लेऑफ्सच तिकीट मिळवा. पण हीच संधी दिल्ली कॅपिटल्सकडेही आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला तर तेही आगेकूच करू शकतात. आणखी एक कमालीचा योगायोग हा की, दोन्ही संघ आपला शेवटचा सामना हा पंजाब किंग्ज विरुद्धच खेळणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्स एक पाऊल पुढे; त्यात प्लेऑफ्सचा डाव साधण्यासाठी घरचं मैदान
मुंबई इंडियन्सच्या संघाने १२ सामन्यातील ७ विजयासह १४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ सामन्यातील ६ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स एक पाऊल पुढे आहे. एवढेच नाही तर दिल्ली विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा संघ भारी ठरला होता. त्यामुळे घरच्या मैदानातील सामना जिंकून १६ गुणांसह ते प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करू शकतात. हा सामना गमावल्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला अखेरचा सामना जिंकूनही १६ गुणांपर्यंत पोहचता येणार नाही.
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
दिल्ली कॅपिटल्ससमोर काय असेल समीकरण?
जर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपल्या घरच्या मैदानातील पराभवाची परतफेड करत वानखेडेचे मैदान मारलं तर त्यांच्या खात्यात १५ गुण जमा होतील. त्यानंतर २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरेल. याचा अर्थ दोन्ही सामने जिंकले तरच ते स्पर्धेत टिकून राहतील. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मुंबई इंडियन्सला नमवले अन् पंजाब विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक संधी निर्माण होईल. मुंबई इंडियन्सचा संघ २६ मे रोजी पंजाबविरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून ते १६ गुणांपर्यंत पोहचू शकतात.
जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला तर कुणाला बसू शकतो फटका?
आयपीएलमधील काही सामन्यात पावसाचे सावट पाहायला मिळाले आहे. जर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पावसाचा व्यत्यय आला अन् सामना अनिर्णित राहिला तर दिल्ली कॅपिटल्सला त्याचा मोठा फटका बसेल. कारण एका गुणांसह ते १४ गुणावर पोहचतील अन् दुसरीकडे मुंबई इंडियन्स एका गुणासह पुन्हा त्यांच्या एक पाऊल पुढे राहिल. या परिस्थितीत दोन्ही संघांसाठी अखेरचा सामना अधिक महत्त्वपूर्ण होईल.