आयपीएल स्पर्धेतील ६३ वा सामना हा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. प्लेऑफ्समधील चौथ्या स्थानासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय? कुणाला होईल फायदा? कोणत्या संघाला बसेल मोठा फटका? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI vs DC यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली तर काय?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने १२ सामन्यात ७ विजयासह १४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. सध्याच्या घडीला हा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १२ सामन्यानंतर १३ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. ते पाचव्या स्थानावर आहेत. जर २१ मे रोजी मुंबईच्या मैदानातील नियोजित सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. मुंबई इंडियन्सचा संघ १५ गुणांसह दिल्ली कॅपिटल्सपेक्षा एक पाऊल पुढेच राहिल.
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
दोन्ही संघातील अखेरच्या सामन्यावर होईल फैसला
२४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा संघ पंजाब किंग्ज विरुद्ध अखेरचा सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला तर या सामन्यातील विजयासह दिल्लीच्या संघाला १६ गुणांपर्यंत मजल मारता येईल. पण याच वेळी त्यांना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील निकालावर अवलंबून रहावे लागेल. मुंबई इंडियन्सचा संघ २६ मेला पंजाब विरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून ते १७ गुणांसह दिल्ली कॅपिटल्सला आउट करून प्लेऑफ्सचं तिकीट मिळवू शकतात. दोन्ही संघांना उर्वरित सामन्यात पराभवाचा धक्का बसला तरी मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरेल.
दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धोका
मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना रद्द होणं हे दिल्ली कॅपटल्सला परवडणारे नाही. आधीच एक सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यात वानखेडेच्या मैदानातील सामन्याची भर पडली तर मुंबई इंडियन्सचा पेपर दिल्लीच्या तुलनेत अधिक सोपा असेल. त्यामुळेच सामना व्हावा, अशीच दिल्लीकरांची इच्छा असेल.