IPL 2025 PBKS vs MI, Qualifier 2 Suryakumar Yadav Break AB De Villiers Record : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून सूर्यकुमार यादवनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या क्वालिफायर २ च्या लढतीत देखील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा सिलसिला कायम ठेवला. सलामी जोडी स्वस्तात आटोपल्यावर तिलक वर्मासोबत त्याने डाव सावरला. यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून आणखी एक अर्धशतक सहज होईल, असे वाटत होते. पण युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. अर्धशतक हुकलं असलं तरी विकेट गमावण्याआधी त्याने आपली जबाबदारी अगदी चोख बजावली होती. एवढेच नाही तर या सामन्यात त्याने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढत त्याने आयपीएलमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नॉन ओपनरच्या रुपात आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता सूर्यकुमार यादवच्या नावे झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०१६ पासून अबाधित असलेल्या एबीच्या विक्रमाला लावला सुरुंग
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात १५ धावा करताच सूर्यकुमार यादव याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला. २०१६ च्या हंगामात एबी डिव्हिलियर्स याने १६ डावात ५२.८४ च्या सरासरीसह १६८.७९ च्या स्ट्राइक रेटनं ६८७ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवनं हा विक्रम मागे टाकला आहे. या सामन्याआधी सूर्यकुमार यादवनं १५ सामन्यात ६७३ धावा केल्या होत्या. पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याने २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली.
टी-२० क्रिकेटमध्ये सूर्या दादाची 'दादागिरी'! टेम्बा बवुमाला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
...तर सूर्यकुमार यादवला ऑरेंज कॅप मिळवण्याचीही संधी
सूर्यकुमार यादव हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. १६ सामन्यात त्याने आपल्या खात्यात ७१७ धावा केल्या आहेत. जर मुंबई इंडियन्सच्या संघाने फायनल गाठली अन् या सामन्यातही सूर्यकुमारचा असाच तोरा दाखवला तर यंदाच्या हंगामात तो साई सुदर्शनला मागे टाकत ऑरेंज कॅपवरही कब्जा करू शकतो. साई सुदर्शन याने १५ सामन्यातील १५ डावात ७५९ धावांसह टॉपला आहे.