पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील काही विमानतळांवरील सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यात धर्मशाला येथील विमानतळाचाही समावेश आहे. हे विमानतळ बंद झाल्यामुळे आयपीएलमधील दोन संघासमोर प्रवासाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI सह DC च्या संघासमोर निर्माण झालाय मोठा प्रश्न
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ५८ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी धर्मशाला येथेच आहेत. या सामन्यानंतर दोन संघासमोर प्रवासासंदर्भातील मोठा प्रश्न असेल. कारण पंजाबचा संघ आठवड्याच्या अखेरपर्यंत इथेच असेल. पण दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला आपला सामना खेळण्यासाठी पुन्हा घरच्या मैदानावर जावे लागले. याशिवाय मुंबई इंडियन्सचा संघ पंजाब विरुद्धचा सामना धर्मशाला येथे खेळणार आहे. विमानसेवा बंद असल्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न MI सह DC च्या संघासमोर निर्माण झाला आहे.
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
DC ला घरी परतण्याचा तर MI ला धर्मशाला येथे पोहचायचे कसे हा प्रश्न
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना ११ मे रोजी नियोजित आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दिल्लीच्या संघाला धर्मशाला येथून पुन्हा घरच्या मैदानावर परतायचे आहे. विमान सेवा तात्पुरी स्थगित असल्यामुळे या संघाला बसने प्रवास करावा लागू शकतो. धर्मशाला ते दिल्ली हे अंतर जवळपास ५०० कि.मी. आहे. या प्रवासासाठी १०-११ तासांचा कालावधी लागू शकतो. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघासमोरही प्रवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ११ मे रोजी मुंबई इंडियन्सचा संघाचा पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना धर्मशाला येथे नियोजित आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ ७ मेलाच चंदीगड मार्गे धर्मशाला येथे रवाना होणार होता. पण ते शक्य झालेले नाही. बीसीसीआयने स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे स्पष्ट केले आहे. पण प्रवासासंदर्भात निर्माण झालेला तोडगा ते कसा काढणार त्यावर सर्वांच्या नजरा असतील.