Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad, 33rd Match : मुंबई येथील वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघानं सनरायझर्स हैदराबादला शह देत यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. तिलक वर्मानं चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. वानखेडेची खेळपट्टीही फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या सामन्यात षटकार चौकारांची बरसात होईल, असे वाटत होते. पण खेळपट्टीनं वेगळाच रंग दाखवला. चेंडू थांबून बॅटवर येत असल्यामुळे फलंदाजांसाठी नंदनवन असणारी खेळपट्टी गोलंदाजांच्या बाजूनं झुकल्याचे दिसून आले. ट्रिकी खेळपट्टीवर हैदराबादच्या सलामी जोडीनं तग धरला. पण जिथं गियर बदलायचा तिथं त्यांनी विकेट्स फेकल्या. परिणामी पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ४ विकेट राखून सामना खिशात घातला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्दिक पांड्यानं फोडली सलामी जोडी
मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने घरच्या मैदानात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादच्या ताफ्यातील सलामी जोडीला पहिल्या षटकात जीवनदान मिळाले. दीपक चाहरच्या षटकात आधी अभिषेक शर्मा आणि त्यानंतर ट्रॅविस हेडच्या विकेटची संधी हुकली. पण त्यानंतरही गोलंदाजांनी दोघांनाही मोठे फटकेबाजी करण्यापासून रोखले. हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला अन् त्याने सलामी जोडी फोडली. अभिषेक शर्मा ४० धावा करून माघारी फिरला. त्याने हेडसोबत पहिल्या विकेटसाठी ४५ चेंडूत ५९ धावांची भागीदारी केल्याचे पाहायला मिळाले.
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
क्लासेनचा क्लास दाखवला, पण बुमराहनं त्याचा खेळ खल्लास केला अन्...
पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा इशान किशन २ धावा करून माघारी फिरला. ट्रॅविस हेडलाही आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवता आली नाही. तो २९ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. नितिश कुमार रेड्डी याने २१ चेंडूत १९ धावा केल्या. क्लासेन याने क्लास दाखवला. पण जसप्रीत बुमराहनं ३७ धावांवर त्याचा खेळ खल्लास केला. अखेरच्या षटकात अनिकेत वर्मानं ८ चेंडूत केलेल्या १८ धावा आणि कमिन्सनं ४ चेंडूत केलेल्या ८ धावांच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६२ धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबई इंडियन्सकडून विल जॅक्सनं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय बोल्ट, हार्दिक पांड्या आणि बुमराह यांनी आपल्या खात्यात एक-एक विकेट जमा केली.
धावांचा पाठलाग करताना रोहितसह सूर्या पांड्याची फटकेबाजी
हैदराबादच्या संघाने सेट केलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने तुफान फटकेबाजी केली. त्याने १६ चेंडूत ३ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. कमिन्सच्या गोलंदाजीवर फुलटॉस चेंडूवर त्याने विकेट फेकली. रायन रिकल्टन याने २३ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. सलामी जोडीशिवाय प्रत्येकाने उपयुक्त धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सूर्यकुमार यादवने १५ चेंडूतील २६ धावांच्या अल्प खेळीत २ चौकार आणि २ षटकार मारलेय विल जॅक्सनं ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक ३६ धावा केल्या. हार्दिक पांड्या ९ चेंडूत २१ धावा करून माघारी फिरल्यावर तिलक वर्माने १७ चेंडूत नाबाद २१ धावा करत चौकारासह मॅच संपवली.