मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यातून जसप्रीत बुमराह आयपीएलच्या मैदानात उतरला. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात तो आपल्या भेदक माऱ्यातील जादू दाखवू शकला नाही. विराट कोहलीनं तर त्याच्याविरुद्ध आक्रमक अंदाजात फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीनं षटकार मारत केलं बुमराहचं स्वागत
पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर जबरदस्त कमबॅक केले. यात विराट कोहलीचा मोठा वाटा होता. आरसीबीच्या धावफलकावर ३ षटकात १ बाद ३३ धावा असताना हार्दिक पांड्याने चेंडू बुमराहकडे सोपवला. दुखापतीतून सावरून परतणाऱ्या बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कल याने एकेरी धाव घेत स्ट्राइक विराट कोहलीला दिले. त्यानंतर बुमराहच्या कमबॅकच्या सामन्यात दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने अप्रतिम षटकार मारत त्याचे स्वागत केले. किंग कोहलीनं खेळलेला त्याचा हा पहिला चेंडू होता.
बुमराहचा पहिला चेंडू खेळताना कोहलीच्या भात्यातून निघालेला फटका होता बघण्याजोगा
जसप्रीत बुमराह विरुद्ध सावध पवित्रा घेतला तर तो आक्रमक अंदाजात प्रतिस्पर्धी फलंदाजावर भारी पडतो. ही गोष्ट लक्षात ठेवूनच कोहलीनं त्याच्या गोलंदाजीवर स्वत: आक्रमक अंदाज दाखवला. बुमराहचा सामना करताना त्याने पहिल्याच चेंडूवर पुढे येऊन मिडविकेटच्या दिशेनं उत्तुंग षटकार ठोकला. सामन्याच्या सुरुवातीला कोहली फार कमी वेळा असा फटका मारताना दिसते. त्यामुळेच त्याचा हा तोरा चर्चेचा विषय ठरत आहे. याशिवाय दोघांच्यातील खास बॉन्डिंगचा सीनही पाहायला मिळाला.
सवंगड्याची इच्छापूर्ती!
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील टीम डेविडनं विराट कोहली अन् फिल सॉल्ट यांनी बुमराहचं स्वागत षटकार किंवा चौकारानं करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. विराट कोहलीनं पहिला चेंडू खेळताना बुमराहला मारलेला सिक्सर म्हणजे संवगड्याची इच्छापूर्तीच ठरली.
विराट कोहलीची कडक फिफ्टी
एका बाजूला जसप्रीत बुमराह कमबॅकच्या सामन्यात संघर्ष करताना दिसले. दुसरीकडे विराट कोहलीनं ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. तो ही खेळी आणखी मोठी करण्याच्या मूडमध्ये दिसत होता. पण हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो झलबाद झाला.