IPL 2025 MI vs KKR 12th Match Player to Watch Suryakumar Yadav Mumbai Indians : यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात ही अडखळत झालीये. क्रिकेट जगतात गाजावाजा असलेल्या टी-२० लीगमधील लोकप्रिय संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आता घरच्या मैदानावर धमक दाखवून यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मुंबई पलटन मैदानात उतरेल. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला ते भिडतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फिरकीचं 'चक्रव्यूव्ह भेदणारे 'ब्रह्मास्त्र'
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात सामन्याला कलाटणी देणारे फिरकीपटू आहेत. वरुण चक्रवर्तीसह सुनील नरेन आणि मोईन अली यांनी आपली जादू दाखवूनही दिलीये. हे गोलंदाज आपल्या फिरकीवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवण्याची क्षमता बाळगून आहेत. यांचा सामना करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात फिरकीला नडणारा भिडू आहे. 'मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव फिरकीचं 'चक्रव्यूव्ह भेदणारे एक 'ब्रह्मास्त्र'च आहे. मैदानातील कानाकोपऱ्यात फटकेबाजी मारण्याची त्याची ताकद कोणत्याही गोलंदाजाचा ताल सूर बिघडवू शकते. नाईट रायडर्स विरुद्धची रात्र गाजवायची असेल तर सूर्या भाऊला आपल्या भात्यातील सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करावा लागेल. वानखेडेच्या मैदानात 'सूर्या'ची किरणं पडली तर मुंबई इंडियन्सचा संघ नाईट रायडर्सविरुद्धची रात्र गाजवेल, यात शंका नाही.
रिक्षा चालकाच्या पोराचं दमदार पदार्पण! कोण आहे MI चा 'इम्पॅक्ट प्लेयर' Vignesh Puthur?
घरच्या मैदानावर सूर्याचा रेकॉर्डही आहे जबरदस्त
मुंबईच्या मैदानात खेळताना सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड ही जबरदस्त राहिला आहे. आयपीएलचा विचार केला तर मुंबईतील वानखेडेच्या मैदानात १००० धावांचा टप्पा पार करणारा सूर्यकुमार हा तिसरा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये खेळताना या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा २२९५ धावांसह अव्वलस्थानी आहे. मूळचा वेस्ट इंडिजचा पण आयपीएलमुळे मुंबईकरचा टॅग लागलेला केरॉन पोलार्डनं या मैदानात १२२६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या खात्यात या मैदानात १०८३ धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादव आयपीएल रेकॉर्ड
सूर्यकुमार यादवनं आपल्या आयपीएल करिअरमध्ये यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यासह १५२ सामन्यात ३२.४९ ची सरासरी आणि १४५.२७ च्या स्ट्राइक रेटसह ३६७१ धावा काढल्या आहेत. यात २ शतकांसह २४ अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यात मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेले नाही. सूर्यानं गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूत केलेली ४८ धावांची खेळी ही पहिल्या दोन सामन्यानंतर मुंबईच्या ताफ्यातील फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.
Web Title: IPL 2025 MI vs KKR 12th Match Lokmat Player to Watch Suryakumar Yadav Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.