Axar Patel Fined, IPL 2025 DC vs MI: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने रविवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) रोमहर्षक सामन्यात पराभव केला. १९व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूवर तीन रनआऊट करत मुंबई इंडियन्सने १२ धावांनी विजय मिळवला. तिलक वर्माच्या ५९ धावांच्या बळावर मुंबईने २०५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना करूण नायरने ८९ धावांची दमदार खेळी केली, पण दिल्लीला केवळ १९३ धावाच करता आल्या. मोक्याच्या क्षणी झटपट बळी गमावल्याने दिल्लीला हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. सामना हरल्यानंतर कर्णधार अक्षर पटेलला BCCI ने आणखी एक धक्का दिला. सामन्यात केलेल्या एका चुकीमुळे त्याला मोठा दंड भरावा लागला.
रविवारी रात्री दिल्ली येथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला त्याच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटमुळे १२ लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, हंगामात पहिल्या स्लो ओव्हर-रेट गुन्ह्यासाठी कर्णधाराला १२ लाख रुपये दंड ठोठवला जातो. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच, जर अक्षरने पुन्हा हीच चूक केली, तर दंडाच्या रकमेत वाढ होऊ शकते.
IPL ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत अक्षर पटेलच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा होता, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे. म्हणून पटेलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पटेलने गुन्ह्याची कबुली दिली असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असल्याचे मान्य केले आहे. यंदाच्या हंगामात, अक्षर पटेलच्या आधी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, लखनौ सुपर जायंट्सचा रिषभ पंत, राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आणि संजू सॅमसन तसेच आरसीबीचा रजत पाटीदार यांनाही स्लो ओव्हर रेटमुळे दंड भरला आहे.
Web Title: IPL 2025 MI vs DC Axar Patel fined for slow over rate delhi capitals vs mumbai indians clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.