आयपीएलमध्ये रविवारी रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाला ९ विकेट्स राखून पराभूत केले. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकरांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीसमोर चेन्नईने दिलेले १७७ धावांचे आव्हान अगदीच तोकडे ठरले. दरम्यान, या लढतीत चेन्नईचा पराभव झाला असला तरी चेन्नईकडून खेळणारा युवा मुंबईकर फलंदाज आयुष म्हात्रे यांने पहिल्याच सामन्यात केलेली फटकेबाजी मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच आयुषची फटकेबाजी पाहताना त्याचा धाकटा भाऊ भावूक झाल्याचे आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागल्याचे दिसून आले.
चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरलेल्या आयुष म्हात्रे याने पहिल्याच सामन्यात आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. आयुषने आक्रमक खेळी करताना चार चौकार आणि दोन षटकारांसह १५ चेंडूत ३२ धावा कुटल्या. दरम्यान, आयुष म्हात्रे फटकेबाजी करत असताना त्याचा धाकटा चुलत भाऊ खूप भावून झाल्याचे दिसून आले. प्रेक्षकांमध्ये बसून सामन्याचा आनंद लुटत असलेला आयुषचा हा भाऊ आनंदाने उड्या मारत होता. तसेच एकवेळ तो खूप भावूक होऊन त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागल्याचं दिसून आलं.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झालेल्या या सामन्यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यावर चेन्नई सुपरकिंग्सने निर्धारित २० षटकांमध्ये ५ विकेट गमावून १७६ धावा काढल्या. चेन्नईकडून शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके फटकावली. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर हा सामना अवघ्या १५.४ षटकांमध्येच नऊ गडी राखून जिंकला.